बहुजन समाज पार्टी ही संत महापुरुषांच्या विचाराने काम करणारा पक्ष – सुनील ओहोळ
श्रीगोंदा, ता. ३ : बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲड.महेंद्र शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीगोंद्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांना पुष्प चादर अर्पण करून तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महापुरुषांचे विचार घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले श्रीगोंदा विधानसभेसाठी मतदार संघातील जे उमेदवार आहेत त्यामध्ये विशेष करून साखर कारखानदार आहेत ज्यांनी शेतकरी कामगार ऊसतोड कामगार यांचे आजपर्यंत शोषण केले असून काहींनी तर खाजगी कार्यक्रम वाढदिवस, जयंती व इतर कार्यक्रमांसाठी कामगार ऊसतोड कामगार व वाहन मालक यांचे पगार व भाडे कपात केले. तसेच काहींनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी आणले ते निवडून आले तरी काय समाजाचे भले करणार यांच्या शैक्षणिक संस्था नोटा छापण्याचे कारखाने झाले असून विद्यार्थी व पालक यांचे आर्थिक शोषण केले जाते अशी टिका ओहोळ यांनी यावेळी केली.
भाजप व शिवसेना दोन्ही एकच आहेत ते लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांना ऍलर्जी असून मराठवाडा नामांतरणाला विरोध करणारी शिवसेना व भाजप एकच आहेत. बहुजन समाज पार्टी ही संत महापुरुषांच्या विचाराने काम करत असून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यांना निवडून दिल्यास येथील भूमिहीन समाजाला जमीन व घराला जागा देऊ तसेच दलित आदिवासी समाजाला व अल्पसंख्यांक समाजाला संरक्षण देऊन त्यांच्यावरील अन्याय अत्याचार रोखू असे ही ओहोळ म्हणाले.
यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, बसपाचे अधिकृत उमेदवार ॲड. महेंद्र शिंदे, विठ्ठल मस्के, कानीफ बर्डे, भीमराव घोडके, शहानवाज शेख, उमाशंकर यादव, नितीन जावळे, अंबादास घोडके, सखाराम पालकर, दीपक घोडके, प्रमोद जाधव सर, रावसाहेब घोडके, डॉ. राम ससाने, संतोष साळवे, योगेश साळवे, काका साळवे, अशोक साळवे, त्रिंबक साळवे, आसाराम काळे, रावसाहेब इंगावे, दत्तात्रय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.