घराणेशाही संपवण्यासाठी माझी उमेदवारी; पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागूनही माझ्यावर अन्याय आणि निलंबन यांची खंत – सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा, ता. ९ : कसलाही कारखाना, कोणतीही शिक्षण संस्था, नसताना सामान्य शेतकऱ्याची मुलगी सुवर्णा पाचपुते ह्या सामान्य जनतेच्या विश्वासावर निवडणूक रिंगणात उतरल्या. पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागूनही पक्षाने घराणेशाहीला प्राधान्य देऊन उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य जनतेशी चर्चा करून अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला असे प्रतिपादन भाजपच्या बंडखोर व अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी कोळगाव येथे केले.
कोळगाव येथे प्रचारार्थ आलेल्या सुवर्णा पाचपुते यांनी उमेदवारी विषयी मत मांडताना सांगितले की, श्रीगोंदा मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील तेच तेच घराणे प्रत्येक निवडणुकीत उभे राहतात अशी घराणेशाही संपवण्यासाठी जनतेच्या मागणीनुसार चांगली प्रतिमा, भ्रष्टाचार मुक्त उमेदवार म्हणून या निवडणुकीत मी उमेदवारी केली आहे, असे सांगून पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यात मी नाही तर माझी बायको, माझा मुलगा अशाच घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळे तालुक्याचा विकास थांबला आहे ,खुंटला आहे .श्रीगोंदा तालुक्याची मागास श्रीगोंदा तालुका म्हणून ओळख मला पुसायची आहे इतर तालुक्यांप्रमाणे श्रीगोंदा व नगर तालुक्याचा विकास करायचा आहे.
तालुक्यातील अनेक उमेदवार एसी गाडीतून फिरतात, त्यांच्या गाडीच्या काचा खाली घेत नाही आणि शेतकऱ्यांसाठी लढू म्हणणारे हे कारखानदार ऊसाला २३०० ते २६०० चे बाजार भाव देतात. इतर कारखानदार ३००० च्या पुढे भाव देत आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आज म्हणत आहेत की, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ हेच कारखानदार कामगारांना वेठीस धरून प्रचारास लावत आहे, त्यांच्याकडून प्रचाराची कामे करून घेत आहेत. तरुणांना रोजगार देऊ असे म्हणणारे साखर कारखानदार व शिक्षण सम्राट तरुणांना काय न्याय देणार असा प्रति प्रश्न त्यांनी केला आहे.
घराणेशाही मुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. याच घराणेशाहीतील नेते प्रत्येक निवडणुकीत सेटलमेंट करतात. कारखाना निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीत, वाळू ठेकेमध्ये, ऊस बाजारभावामध्ये एकमेकांमध्ये तडजोड करून स्वतःची पोळी भाजतात आणि विधानसभा निवडणूक आली की एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करतात हे जनतेने ओळखले आहे. ज्येष्ठ म्हणून मलाच,महिला राखीव म्हणून बायकोला व युवा म्हणून मुलाला उमेदवारी आलटून पालटून मागत आहेत.त्यामुळे लोकशाही खुंटली असून घराणेशाही पुढे आली आहे. मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी असून मला कसलाही राजकीय वारसा नाही व माझ्या पुढच्या पिढीतील ही कोणी राजकारणात येणार नाही. घराणे शाहीला संपवणे हाच उद्देश समोर ठेवून सर्वसामान्य जनतेतून पर्याय विरोधकांच्या पुढे ठेवला आहे. याच नेते मंडळींनी प्रत्येक गावात गटतट उभे केले आहेत, घराघरात फूट पाडून कार्यकर्ते तयार केले आहेत व हेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात पक्षाचे तिकीट घेऊन उभे करायचे आणि आपापसात भांडणे लावायची हाच उद्योग या मंडळींनी आजपर्यंत केला आहे. गटतट संपवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. माझा कुठल्याही गावात गट तट नसल्याने तळागाळातील जनतेतून मला मतदान होईल त्यामुळे पंधरा हजाराच्या मताधिक्याने मी आमदार होईल असा विश्वास सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केला.
गेल्या चार महिन्यापासून प्रत्येक गावागावात “फिक्स उमेदवार- मनातील आमदार ” या मार्फत जनतेमध्ये स्थान पक्के केले आहे, लोकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या आहेत, त्यांच्या मनामनात पोहोचली आहे. त्यामुळे मला गेल्या पंधरा वर्षातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने महिला, शेतकरी, तरुण वर्ग व सर्व मतदारांचा खंबीर पाठिंबा या निवडणुकीतून मिळत आहे. माझ्या उमेदवारीमुळे कोणाला फटका बसेल हे मला माहीत नाही. कोणासाठी मी उमेदवारी केलेली नाही, जनतेसाठी माझी उमेदवारी आहे. मला कोणीच स्पर्धक नाही, विरोधकच एकमेकांचे स्पर्धक आहेत. कोण कोणाचे मते खाण्यासाठी उभे राहिले हे सर्व जनतेला माहित आहे. मी कोणाचे मत खाण्यासाठी व कोणाला पाडण्यासाठी उभी नाही असे सांगून सर्वसामान्य जनतेला खात्री होती की माझा उमेदवारी अर्ज कितीही दबाव आला तरी कायम राहील आणि मी जनतेसाठी तो मागे घेतला नाही. या निवडणुकीत घराणेशाही, आर्थिक बाबी महत्त्वाच्या नसून पात्र, सक्षम, निर्भीड व निपक्ष उमेदवार जनता निवडून देईल असा विश्वास सुवर्णा पाचपुते यांनी कोळगाव येथील प्रचार फेरीत व्यक्त केला.