चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा
श्रीगोंदा, ता. ९ : तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तीन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर रस्त्याचे खडीकरण देखील झाले. परंतु या रस्त्याचा प्रश्न पुन्हा दोन महिने दुरुस्ती पासून थांबला. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून देखील दोन्ही बाजूने चर काढण्यास अडथळा व अतिक्रमण केल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे मत संबंधित ठेकेदारांनी व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता होके साहेब यांच्याशी दोन दिवसापूर्वी सविस्तर चर्चा करून सदर रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यामध्ये साखर कारखान्यांचे गाळप हंगाम काही दिवसानंतर सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत या रस्त्यातून ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने सभासद कामगारांची वर्दळ वाढणार असून मोठ्या प्रमाणावर ये जा करणार आहेत. तत्पूर्वी सदर रस्ता लवकरात लवकर मजबुतीकरण व डांबरीकरण करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा; अशा प्रकारच्या सूचना संबंधित उपाभियंता होके साहेब यांना ज्येष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी केल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊन गाळप हंगामापूर्वीच सदर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ताबडतोब संबंधित ठेकेदारांनी सदर नादुरुस्त रस्त्यावर कच टाकून रस्ता दुरुस्तीसाठी काम सुरू केले आहेत.
याच रस्त्यावर रस्ता दुरुस्ती प्रसंगी शेतकऱ्यांकडून मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने चर काढण्यास विरोध होत असल्याने अतिक्रमण धारक शेतकरी यांना संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची लांबी रुंदी काढून संबंधित अतिक्रमण संदर्भात शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग व श्रीगोंद्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता यांच्याशी समेट घडून सविस्तर चर्चा करून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांच्याकडे पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याने सदर नादुरुस्त रस्त्याचे कामाचा तिढा सुटला गेला आहे.