श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत चुरशीच्या चौरंगी लढतीमध्ये कोण होणार विजेता? २०१९ च्या तुलनेत यावेळी सरासरी ५ टक्के जास्त मतदान झाले! सायंकाळी उशिरा झालेल्या मतदानाचा टक्का वाढला याचा फायदा कुणाला होणार यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार असा अंदाज लोकांमधून वर्तवला जात आहे चारही प्रमुख उमेदवारांनी केला विजयाचा दावा..!
श्रीगोंदा, ता. २१ : श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघामध्ये दि. २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडली एकूण ७२.२८ टक्के मतदान झाले २०१९ च्या तुलनेमध्ये यावेळी सरासरी ५ टक्के जास्त मतदान झाले, ५ वाजेपर्यंत ५५.४९ टक्के मतदान झाले होते त्यानंतर काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी ५ वा. नंतर १६.७९ टक्के मतदान झाले म्हणजे ५७ हजार ०१५ मतांची वाढ होऊन मतांची टक्केवारी वाढली याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे अशी लोकांमधून चर्चा होत आहे. भावी आमदारांचे नशीब ईव्हीएम मशीन मध्ये कैद झाले असून येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे कोण होणार आमदार हे त्यावेळी स्पष्ट होईल.
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये १६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले पैकी चार प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत रंगली. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे, महायुतीचे विक्रम पाचपुते, वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार व महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या चौरंगी लढतीमध्ये या चारही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. तसेच अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या नावाची ही काही ठिकाणी चर्चा होती.
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघा मध्ये एकूण ३ लाख ३९ हजार ५२६ मतदार आहेत त्यामध्ये झालेले मतदान हे एकूण २ लाख ४५ हजार ४०९ इतके म्हणजे ७२.२८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक निरीक्षक डी. रत्ना, निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.क्षितिजा वाघमारे, सहाय्यक नायब तहसीलदार पंकज नेवसे, आचारसंहिता विभाग प्रमुख राणी फराटे, पुष्पगंधा भगत, या अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस निरीक्षक किरणकुमार शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. तसेच राखीव पोलीस दल, निवडणूक कर्मचारी यांनी या निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेतली.
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी दि. २३ रोजी शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड श्रीगोंदा या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून संपूर्ण मतमोजणी पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करतील. मतदारसंघातील सर्वांचे निकालाकडे लक्ष असणार आहे त्यामुळे येत्या २३ तारखेला कोण होणार आमदार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.