वयाच्या ९५ व्या वर्षी डॉ.बाबा आढाव यांनी लोकशाही मुल्ये अबाधित ठेवण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांना समजावा म्हणून पुणे येथे पुकारलेले आत्मक्लेश उपोषण आजच्या घडीला प्रेरणादायीच – निशांत लोखंडे मुख्य प्रवर्तक आत्मक्लेश उपोषण
श्रीगोंदा, ता. २९ : सामाजिक चळवळीतील असंघटित कष्टकरी,कामगारांचे ज्येष्ठ नेते डॉ.बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनादिवशी सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून श्रीगोंदा येथील महात्मा फुले सर्कल येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते रुपेश काळेवाघ आणि युवा उद्योजक प्रशांत साबळे यांनी दि. २८ रोजी पूर्ण एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण केले.
राज्यघटनेतील नियम आणि लोकशाही मुल्यांची थट्टा सध्याच्या देशातील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून चालू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील निवडणूकांमध्ये झालेला साधनसामग्रीचा बेसुमार वापर, विद्यमान महायुती सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार आजपर्यंतच्या इतिहासात कधी पाहिला नाही त्यामुळे लोकशाहीवर श्रद्धा असणारा प्रत्येक घटक अस्वस्थ आहे आणि हि अस्वस्थता राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या माध्यमातून आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा निर्धार डॉ.बाबा आढाव यांनी केला.
सत्यशोधक चळवळीचे संस्थापक, समतेचे,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची गरज आजच्या घडीला नितांत गरजेची असल्यामुळे आणि महात्मा फुले यांनी लिहिलेल्या “शेतकऱ्याचा आसूड” या ग्रंथाच्या नावाचा आधार घेत सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अनागोंदी कारभारावर आसूड ओढण्याची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झाली आहे ही भावना निशांत लोखंडे यांनी व्यक्त केली.
वयाच्या ९५ व्या वर्षी डॉ.बाबा आढाव यांच्यासारखे वयोवृद्ध नेते जीवाचा विचार न करता देशातील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या दडपशाहीला लोकशाहीतील नियमांच्या माध्यमातून आवाहन देतात तेव्हा हे चित्र अस्वस्थ असणाऱ्या इथल्या प्रत्येकाला आशादायी वाटते म्हणून श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले स्मारक येथे डॉ.बाबा आढाव यांच्या तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणाला पाठिंबा देणारे एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्याची हिंमत निर्माण झाली असे निशांत लोखंडे यांनी सांगितले.
निवडणूकीच्या तोंडावर सरकारी योजना निर्माण करुन मतदारांना प्रलोभने,आमीष दाखविले गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारुन सुद्धा निवडणूक आयोग काहीच कारवाई करु शकला नाही हि खंत घेऊन डॉ.बाबा आढाव यांनी हे उपोषण हाती घेतले. तसेच भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांची आणि संविधान, लोकशाही आपल्याला कशी मिळाली याची जागरुकता निर्माण व्हावी म्हणून आत्मक्लेश उपोषणाची घोषणा केल्याचे डॉ.बाबा आढाव यांनी स्पष्ट केले आहे.
महासत्ता असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होते तर भारत देशात सध्या निर्माण होत असलेल्या शंकास्पद परिस्थितीमुळे ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी आणि ती पारदर्शक पद्धतीने व्हावी त्यामुळे आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांपर्यंत डॉ.बाबा आढाव यांच्यासारखा वयोवृद्ध नेता लोकशाही वाचविण्यासाठी लढतोय हा संदेश जावा ही प्रांजळ आणि सरळ भावना घेऊन श्रीगोंदा शहरातील महात्मा जोतिबा फुले स्मारक येथे आत्मक्लेश उपोषण करत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते रुपेश काळेवाघ आणि युवा उद्योजक प्रशांत साबळे यांनी पूर्ण एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव आनंदकर, सामाजिक कार्यकर्ते एम.डी.शिंदे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रसाद काटे, काँग्रेस पक्षाचे ओबीसी तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे,काँग्रेसचे कार्यकर्ते राजू राऊत आणि अन्य नागरिकांनी भेट देत आंदोलनास पाठींबा दर्शविला.