टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ सप्टेंबर २०२२ : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि., चे संस्थापक व साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे तथा बापू यांचे चतुर्थ पुण्यस्मरण सोमवार दि. १९.९.२०२२ रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केले असुन त्यानिमित्त सकाळी १० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांचे प्रवचन होणार आहे. सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व दिपकशेठ नागवडे यांनी केले आहे.
स्वर्गीय शिवाजीराव बापू नावगडे यांनी आयुष्यातील ५५-६० वर्ष श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पीत भावनेने काम केले. नागवडे सहकारी साखर कारखान्याची उभारणी, श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बेलवंडी शुगर येथे सुरु केलेले पहिले पॉलिटेक्निक कॉलेज, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय या संस्थांची उभारणी व गौरवशाली वाटचाल ही स्व. बापुंच्या जीवनातील अतिशय महत्वपुर्ण टप्पे आहेत. सामाजिक, राजकिय, सहकार, शिक्षण, कृषि, सिंचन, दळणवळण, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील बापुंचे योगदान हे चिरस्मरणीय आहे.
दुर्दैवाने चार वर्षापुर्वी बापुंचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे तालुक्याच्या सामाजिक व राजकिय क्षेत्रात कधीही भरुन येणार नाही अशी पोकळी निर्माण झालेली आहे. मागील दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांच्या पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम करणे शक्य झाले नाही.
येत्या सोमवारी १९ रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत वारकरी सांप्रदायातील एक नामवंत किर्तनकार ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांची प्रवचन सेवा होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्रदादा नागवडे व दिपकशेठ नागवडे यांनी केले आहे.
स्त्रोत:(प्रेसनोट)