प्रशासन दगडासारखे काम करत आहे या भावनेने दगडाला भूमी अभिलेख प्रशासनाचे नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर पाण्याचा अभिषेक करत निषेध आंदोलन करण्यात आले..!
श्रीगोंदा, ता. ९ : श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी व चौक सुशोभिकरण या कामासाठी आवश्यक असलेली चौकातील जागेची मोजणी होऊन अनेक दिवस झाले. तरी अद्याप भूमी अभिलेख विभागाने मोजणी नकाशा उपलब्ध करून दिलेली नाही. तसेच सदर जागेवर खुणा करून देत नाही. यामुळे भूमी अभिलेख प्रशासनाचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन निषेध आंदोलन केले. प्रशासन दगडासारखे काम करत आहे या भावनेने दगडाला भूमी अभिलेख प्रशासनाचे नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर पाण्याचा अभिषेक करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व चौक सुशोभिकरण कामासाठी विलंब हा फक्त प्रशासनाच्या नाकर्तेपण व उदासीन धोरणामुळे होत आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी यावेळी बोलताना केला. नकाशा व खुणा करण्यासाठी अनेकवेळा नगरपरिषद प्रशासनाकडून व संभाजी ब्रिगेड कडून पाठपुरावा करूनही भूमी अभिलेख विभागाने काम केले नही.
छत्रपती संभाजी महाराज अखंड महाराष्ट्राची अस्मिता असुन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे छत्रपतींच्या कामास विलंब होत असल्याने शंभु प्रेमी व संभाजी ब्रिगेड यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे प्रशासन दगडासारखे काम करत आहे या भावनेने दगडाला भूमी अभिलेख प्रशासनाचे नाव देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर पाण्याचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्य दिलीप आबा वाळुंज, तालुकाध्यक्ष इंजि. शाम भाऊ जरे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, सचिव सुहास गाडेकर, संघटक संतोष आरडे मेजर, शहराध्यक्ष सुहास होले, उपाध्यक्ष अजीज शेख, संघटक सुनील रोही, भटके विमुक्त संघटनेचे नेते संजय सावंत, खादी ग्राम उद्योगाचे बबन श्रीराम, लिंपण गावचे उपसरपंच निलेश कुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम कुटे आदी उपस्थित होते.