श्रीगोंदा, ता. १७ : भूमिअभिलेख प्रशासन, श्रीगोंदा नगरपरिषद प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांच्या संयुक्त मोजणी प्रक्रियेमुळे अखेर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न कायमचा सुटला.
प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत काल दि. १६ डिसेंबर रोजी आवश्यक असलेले सर्व शासकीय विभाग यांनी संयुक्त मोजणी करून चौकात खुणा करून देऊन छत्रपती संभाजी महाराज चौक शुशोभिकरणाच्या कामाचा मार्ग कायमचा मोकळा करून दिला. चौक शुशोभिकरनाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली चौकाची शासकीय मोजणी प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करून काम सुरू करावे यासाठी संभाजी ब्रिगेड कडून मागच्या आठवड्यात तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
पेडगाव रोड या चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण नगरपरिषदेकडून करण्यात आल्यानंतर या चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व संभाजी महाराज यांच्या नावाने चौकाचे शुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड व समस्त शंभु प्रेमी यांच्याकडून करण्यात आली होती.
यावेळी नगरपरिषददेकडून चौक सुशोभिकरण या कामासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु चौकाची मोजणी झालेली नसल्याने या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले आणि कामाला स्थगित करण्यात आले.
तालुक्याचे आमदार बबन दादा पाचपुते यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आणि या स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा याच चौकातील महसूल विभागाकडून स्मारकासाठी नगरपरिषद व तत्कालीन तहशीलदार ढोकले साहेब यांच्याकडून मंजूर करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
सदर महसूल विभागाच्या जागेत काही खाजगी अतिक्रमण असुन ते अतिक्रमण काढण्यासाठीचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने स्मारकाचे काम न्यायालयाचा आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष इंजि. शाम भाऊ जरे यांनी सर्व प्रशासनाचे
संभाजी ब्रिगेड व समस्त शंभु राजे प्रेमी यांच्या वतीने आभार मानले. तसेच जागेचा प्रश्न सुटल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला लवकरात लवकर पुढील प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय शेळके, सतीश बोरूडे, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे, संघटक संतोष आरडे मेजर, शहराध्यक्ष सुहास होले, संघटक सुनील रोही आदी मान्यवर उपस्थित होते.