अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय व सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न जुन्या नव्या पत्रकारांना लंके, होलम, कुलथे, ढमाले यांचे मार्गदर्शन
अहिल्यानगर, ता. १९ : स्वातंत्र्यपुर्व काळातील पत्रकारांनी देश स्वतंत्र करण्यासाठी आपली लेखणी झिजविली, लपून वृत्तपत्रे छापून वितरीत केली. लोकांमधे जागृती केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर राजकीय पत्रकारीता करून देशाच्या विकासात हातभार लावला. तर आताची पत्रकारीता विकास पत्रकारीता असून देशहितासाठी ही महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी केले.
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय व सीएसआरडीची समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या वतीने पत्रकारांची जिल्हास्तरीय कार्यशाळा ता.१७ डिसेंबर रोजी सीएसआरडी सभागृह येथे संपन्न झाली यावेळी मोघे बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी पत्रकारांसाठी असणाऱ्या विविध योजना तसेच नियमावली याविषयी मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की, ५० वर्ष वय असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र मिळताना कायद्याची सवलत आहे. त्यांना सहानुभूतीपुर्वक वागणूक दिली जाते. अनेक ज्येष्ठ पत्रकारांना केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. आरोग्यविषयक सवलती, प्रवास सवलती आदींसह इतर सरकारी सवलती मिळताना काय कार्यवाही करायची असते याची सविस्तर माहिती दिली.
तसेच जिल्हा माहीती अधिकारी कार्यालय आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहे, असे आश्वासन दिले. त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या नव्या जुन्या पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. अनेक कौटुंबिक योजनांची माहिती दिली. असहाय पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी १ ते ५ लाखापर्यंत सरकारी सवलत असल्याची माहिती दिली.
सुरूवातीला नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी अधिस्वीकृती बाबतची प्रक्रिया पत्रकारांना अवगत केली. नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीमार्फत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देत समिती ही पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असून सर्व योजना त्यांनी समजून घ्याव्यात, असा आग्रह केला.
कार्यशाळेसाठी प्रकाश कुलथे, रामदास ढमाले हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. कुलथे व ढमाले यांनीही आपल्या अनुभवाचा नव्या पत्रकारांना लाभ व्हावा यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
सीएसआरडीचे डॉ. विजय संसारे यांनी अशा कार्यशाळा कायम घेण्यात याव्यात यामधून पत्रकारांनी वेगवेगळ्या योजनांची माहिती घ्यावी. यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे नेहमीच पाठबळ देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनखाली आपले महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेईल, असे आवर्जून सांगितले.
सुत्रसंचालन प्रा. सॅम्युअल वाघमारे, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिस्वीकृती समिती सदस्य विजयसिंह होलम यांनी केले तसेच आभार बीजेएमसीचे विद्यार्थी भैरवनाथ वाकळे यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी किशोर ढगे, प्रदीप रत्नपारखे तसेच इतर शिक्षक कर्मचारी तसेच बीजेएमसीचे विद्यार्थी अतुल देठे, प्रशांत पाटोळे, मगर नवनाथ, मरयम सय्यद, एस्थर होलुपुई, रसिका चावला, दिपक शिरसाठ, पंकज गुंदेचा, अंतरिक्ष पुरी, तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमासाठी संतोष गायकवाड, विजय केदारे, ललिता केदारे यांच्यासह जिल्हाभरातून ज्येष्ठश्रेष्ठ तसेच नविन पिढीचे अनेक पत्रकार उपस्थित होते. या कार्यशाळेचा चांगला लाभ झाल्याची पत्रकारांमध्ये चर्चा होती.