सुभेदार मेजर विजय इथापे यांनी ३२ वर्ष भारत मातेची खडतर देशसेवा केली
श्रीगोंदा,ता. २ : तालुक्यातील एरंडोली गावचे माजी सैनिक विजय राजाराम इथापे वय ५२ यांचे मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. शेतात उतारावर ट्रॅक्टर उभा करून ते ट्रॅक्टर कडे पाठ करून पुढे जेवण करत होते. मात्र अचानक ट्रॅक्टरची उटी सटकली व त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर जाऊन ते गंभीर जखमी झाले असे त्यांनी स्वतः जखमी अवस्थेत असताना सांगितले व प्रत्यक्षदर्शीनी तशी माहिती दिली. बेलवंडी पोलीस स्टेशनला तसा प्रकारचा आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
कै. विजय इथापे यांनी भारतीय सेना दलात सुभेदार पदावर जवळपास ३२ वर्षे सेवा केली होती. ते तीन महिन्यापूर्वी नुकतेच सेवेतून निवृत्त झाले होते. प्रदीर्घ सेवा केल्यामुळे गावात त्यांची जंगी मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला होता.आपणाला आता आधुनिक शेती करायची असे म्हणत ते शेतीत राबत होते. इतकी वर्षे भारत मातेची सेवा केली पण काळ्या आईची सेवा करताना विचित्र अपघात घडून त्यांचे निधन झाले.
विजय इथापे यांनी सेवेत प्रारंभ होण्यापूर्वी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी सेनादलात कार्यरत असताना जोधपुर, लेहलडाख, जम्मू काश्मिर, पठाणकोट इत्यादी ठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. मेजर इथापे हे अत्यंत शांत मनमिळावू मितभाषी स्वभावाचे होते.
अपघाताची कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने बेलवंडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती आणखीनच खालवली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना नगर येथील खाजगी दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांचे वाटेतच निधन झाले.
मेजर इथापे यांच्या निधनानंतर श्रीगोंदा शासकीय रुग्णालयात शवाविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा हंबरडा फोडला होता. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक आजी माजी सैनिक, नातेवाईक, असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. माजी सैनिकांनी यावेळेस त्यांना मानवंदना दिली. भारत मातेचा जयघोष करत ते आनंतात विलीन झाले.
या आकस्मित निधनाने इथापे कुटुंबासह एरंडोली पंचक्रोशीतील गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, आई वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.