नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांचा सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी श्रीगोंद्यात जनता दरबार..!
श्रीगोंदा, ता. ३ : श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेची कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत,सर्वसामान्यांना होणारे शासकिय कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत तसेच जनता व अधिकारी यांचा समन्वय साधला जावा या हेतूने सर्व शासकिय अधिकारी एकाच छताखाली बोलावून शासकिय कामे विनासायास पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमदार पाचपुते यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंदा येथील माऊली निवास येथे जनता दरबार घेण्याचे ठरवले आहे.
त्याचेच पहिले पाऊल म्हणून सोमवार ६ जानेवारी २०२५ रोजी श्रीगोंदा येथे होणारा जनता दरबार असून आमदार पाचपुते यांनी ज्यांचे काही कामे बाकी असतील,ज्यांच्या कामांमध्ये काही त्रुटी निघत असेल अशा सर्व नागरिकांना आव्हान केले आहे कि, सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत माऊली निवास येथे नावनोंदणी करून आपले कोणत्या विभागात काम आहे ते नमूद करावे.
सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह महसूल विभाग,पंचायत समिती, पोलीस विभाग, भूमि अभिलेख, नगरपालिका ,कृषी विभाग ,वीज वितरण व अन्य सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबाराचा लाभ घ्यावा,अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली आहे.