श्रीगोंदा, ता. १ : कोळगाव चे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांची श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सरपंचांमधून जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झाल्याने श्रीगोंदा तालुक्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक तालुक्याला निधी वितरित करून विकास कामे मार्गे लावण्यासाठी जिल्हा परिषदेची नियोजन समिती कार्यरत असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत विभाग) हे या समितीचे प्रमुख असतात . ते प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच या समितीवर नियुक्त करतात. या समितीच्या माध्यमातून 15 आयोग वित्त आयोगाला जो निधी प्राप्त झाला त्यामध्ये तालुक्यामध्ये विकास कामे मार्गे लावणे, नियुक्त सरपंचांच्या मार्फत तालुक्यातील सर्व सरपंचांना मार्गदर्शन करणे, त्यांची प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, तसेच या वित्त आयोगामार्फत संपूर्ण तालुक्यात योग्य प्रमाणात निधीचे वाटप करणे अशी विविध कामे असतात.
त्यामुळे पुरुषोत्तम लगड यांचे जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर निवड झाल्याने त्यांचे माजी खासदार सुजय विखे, आमदार विक्रम सिंह पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
श्रीगोंदा तालुक्यातून सर्व सरपंचांमधून जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर निवड झाल्याने श्रीगोंदा तालुक्यासाठी हा बहुमान असून या नियोजन समितीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगामध्ये प्राप्त झालेला निधी चालू वर्षाच्या आराखड्यातून जास्तीत जास्त गावांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच बंधीत व अबंधित कामे मार्गी लावणार आहे. या पदाचा उपयोग श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावांना निधी उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावण्यासाठी करणार असल्याचे प्रतिपादन कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी केले.