श्रीगोंदा, ता. १० : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्ती – टाकळी कडेवळीत येथील इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेल्या अर्णव दत्तात्रय वाळूंज याने किल्ले रायगडवर सादर केलेल्या “मी जिवा महाला बोलतोय” या एकपात्री अभिनयाने शिवभक्त रोमांचित झाले. शिवजयंतीपुर्व जमलेल्या हजारो शिवशंभू प्रेमींनी कौतुक केले तसेच अनेकांनी बक्षीसही दिले.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये अर्णव वाळूंज हा आपल्या पालकांचे सोबत सहभागी झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दरम्यान किल्ले रायगडावर अर्णव ने आपली कला सादर केली.
“मी जिवा महाला बोलतोय या एकपात्री अभिनयामध्ये तो म्हणाला इतिहास वाचून चालत नाही तर,इतिहास घडवायला शिका आर मरणाचं भ्या कशाला बाळगायच. आज ना उद्या ते येणारच आहे. लाचारांच्या दुनियेत आज तुम्ही मात्र स्वाभिमानी बना. आज तुम्हाला किल्ले नाही जिंकायचे, वकील बनायचय , इंजिनियर बनायचंय, कलेक्टर बनायचंय, डॉक्टर बनायचं, न्यायाधीश बनायचंय, पुस्तक हिच आपली ढाल, पेन हीच तलवार ! “उच्च पदाचे किल्ले जिंकू आम्ही शिवबाचे शिलेदार!”अशा धारदार वाणीने त्याने उपस्थित सर्वच शिवशंभू भक्तांचे मन जिंकून घेतले.अफजलखान वधाचा प्रसंग जिवंत केला. “होतें जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले. तर काहींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काहींनी त्याला खांद्यावर घेऊन मिरवले तर काहींना गळाभेट घेतली. त्याच्या धारदार शब्द वाणीचे व अभिनयाचे संपुर्ण महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.
या एकपात्री अभिनयासाठी अर्नवचे वर्गशिक्षक शाळेचे मुख्याध्यापक विजय गायकवाड, व राजेश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज, उपाध्यक्ष राजेश आजबे, नारायण वाळुंज, नितिन वाळूंज, फक्कड वाळुंज,रावसाहेब वाळूंज, ॲड अशोक वाळुंज, महेन्द्र वाळुंज,अनिरुद्ध वाळुंज, राहुल वाळुंज, शिवहारी वाळूंज, यांसह अनेक पालकांनी, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी माता पालकांनी अर्नवचे अभिनंदन केले आहे.