श्रीगोंदा, ता २५ : तालुक्यातील अनेक गावांतील पाझर तलाव व गाव तलावांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा होत असून तलाव परिसरात विहिरींचे उत्खनन झाले असल्यामुळे पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अनधिकृत पाणी उपसा व विहिरींचे उत्खनन बंद करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम जरे यांनी प्रशासनास दिले होते.
या निवेदनाची दखल घेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाझर तलाव व गाव तलावांमधून अनाधिकृतपणे पाणी उपसा थांबवा तसेच विहीरींचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प.ल.पा. उपविभाग श्रीगोंदा यांनी दिले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिनस्त असणारे पाझर तलाव व गाव तलावांतील पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा होत असल्याने भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. तसेच काही पाझर तलाव व गांव तलाव यांच्या हद्दीमध्ये अनाधिकृत रित्या विहिरींचे उत्खनन झालेले असून अनाधिकृतरित्या इलेक्ट्रीक डी. पी. बसविण्यात आलेल्या आहेत. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अनधिकृत पाणी उपसा तात्काळ बंद करून पाझर तलावाचे पाणी साठा संरक्षित करण्यात यावा अशी मागणी शाम जरे यांनी केली होती.
तालुक्यातील ग्रामपंचायत अधिनस्त असणारे पाझर तलाव व गांव तलाव हे शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन परिपत्रक क्रं लपायो-१००२/प्र.क्र. १५६ / जल-३ दि. ०७ मे २००३ अन्वये ग्रामपंचायतींकडे हस्तांतरीत करण्यात आलेले असुन त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची संपूर्णत: जबाबदारी ही ग्रामपंचायतींची आहे. ग्रामपंचायत अधिनस्त असलेल्या पाझर तलाव व गांव तलाव यातील पाणी हे अनाधिकृतपणे उपसा झाल्यास व भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्यास त्याची संपूर्णत: जबाबदारी ग्रामपंचायतींची असणार आहे.
त्या अनुशंगाने पाझर तलाव व गांव तलावातुन अनाधिकृतपणे पाणी उपसा व विहीरींचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प.ल.पा. उपविभाग श्रीगोंदा यांनी दिले आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष शाम जरे यांनी यावेळी दिली.