श्रीगोंदा, ता. ६ : तालुक्यातील पाझर तलाव व गाव तलावांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या व स्थानिक ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयात बेमुदत पाणी वाचवा आंदोलन केले. या आंदोलनास तहसिलदार क्षितिजा वाघामारे, गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी भेट देवून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
काही लोकांद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अनधिकृतपणे ऊपसा पाझर तलावातून होत असल्याने भविष्यातील भीषण पाणी टंचाई आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पाणी प्रश्नाबाबत गांभीर्य दाखवून प्राधान्य क्रमाने तात्काळ पंचनामे करून पाझर तलावांतून होणारा अनाधिकृत पाणीऊपसा बंद करवा तसेच दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम जरे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत पाणी वाचवा आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेवून तहसीलदार वाघमारे यांनी रात्री उशिरा तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाझर तलावातील अनाधिकृत पाणी उपसा बंद करून दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वत: या कारवाईत सहभागी होऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि तहसिलदार वाघमारे यांनी आंदोलनाची योग्य दखल घेत तातडीने कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने पाझर तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष इंजि. शाम जरे यांनी यावेळी बोलताना दिली.
आंदोलन यशस्वी होण्यासाठी शेतकरी आघाडीचे जिल्हाधक्ष दिलीप आबा वाळुंज, तालुका संघटक संतोष आरडे मेजर, तालुका उपाध्यक्ष रवींद्र महंदुळे, सरपंच विकास इंगळे, संदीप साळवे यांच्यासह पिसोरेखांड, महांदुळवाडी, भावडी, लोणी व्यंकनाथ, हिरडगाव इ. गावचे शेतकरी उपस्थित होते.
चौकट
संभाजी ब्रिगेड प्रशासनाचा आरसा…
संभाजी ब्रिगेड प्रशासनाचा आरसा असून त्यांनी आंदोलनाद्वारे केलेली मागणी योग्य आहे. भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. योग्य वेळी भविष्यातील पाणी समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे होणारे नुकसान टाळता येणार असल्याची माहिती तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी यावेळी दिली.