सातारा, ता. ७ : वादग्रस्त छावा हिंदी चित्रपटा संदर्भात चर्चा करण्यासाठी दि.६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजघराण्याचे थेट १३ वे वंशज छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांची शंभुपत्नी महाराणी येसुबाई तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याच्या किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील वंशजांसह अन्य राजे शिर्के परिवारातील सदस्यांनी भेट घेऊन सविस्तर सकारात्मक चर्चा करत निवेदन पत्र दिले.
बैठकी दरम्यान राजेशिर्के यांनी महाराज साहेब यांना वादग्रस्त छावा चित्रपटाच्या माध्यमातून जो खोटा इतिहास दाखवून छत्रपतींच्या जवळील नातेवाईक राजेशिर्के घराण्यातील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व श्रीमंत कान्होजीराजे शिर्के यांना बदनाम केले आहे व अजूनही करत आहेत. छावा चित्रपट चांगला असला तरी यात मुद्दामपणे समस्त राजेशिर्के परिवार बदनामीच्या फेऱ्यात अडकवला आहे. मोघलांना खलनायक दाखवायचे सोडून मराठा घराणेच दोषी दाखविले आहे. यामुळे जगाला चुकीचा संदेश गेला आहे. अशा बेजबाबदार चित्रपट टिमवर कडक कारवाई व्हावी चुकीला माफी देऊ नका अशी राजेशिर्के यांनी जोरदार मागणी करत तात्काळ निर्णय घ्यावा असे सर्वांनी सांगितले यावर महाराजांनी साकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी राजेशिर्के घराण्याचे वंशज दिपकराजे शिर्के, लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्यासह जेष्ठ लेखक शिवाजीराव शिर्के, भूषणराजे शिर्के, वकिल सचिनराजे शिर्के, चेतनराजे शिर्के, भारतराजे शिर्के, नवनाथ राजे शिर्के, शशीराजे शिर्के, कुमार पवार, अन्य राजेशिर्के बंधु समस्त शिव- शंभुभक्त व मराठा बांधव उपस्थित होते.