प्रति महिला १ लाखाचे कर्ज असे १ कोटींचे कर्ज वाटप
श्रीगोंदा, ता. ९ : विठ्ठलराव वाडगे यांनी दूरदृष्टीतून तालुक्यात बचत गट द्वारे महिलांना कर्ज पुरवठा करून महिला सक्षमीकरणात योगदान दिले शिवाय महिला दिनाचे औचित्य साधत वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था मार्फत सफाई कामगारांचा सन्मान आणि प्रति महिला १ लाखाचे कर्ज असे १ कोटींचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ.सौ.प्रतिभा पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे बोलताना सांगितले.
विठ्ठलराव वाडगे यांच्या पुढाकारातून वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था वतीने आयोजित सफाई कामगार सन्मान आणि कर्ज वाटप प्रसंगी सौ.पाचपुते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मा. नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे होत्या.
सौ.पाचपुते पुढे म्हणाल्या महिलांनी उद्योग व्यवसाय मधून पुढे यावे आपला आर्थिक उत्कर्ष साधावा तसेच आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील जागरूक रहावे.
यावेळी बोलताना डॉ.सौ.भाग्यश्री ताकपेरे यांनी धावपळीच्या जीवनात तसेच फास्टफूड च्या जमान्यात महिलांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका विविध योजनांच्या माध्यमातून आपले आरोग्य समस्या वर उपचार घ्या तसेच आरोग्य समस्या निर्माण होणार नाही असा आहार घेण्याचे आवाहन केले.
ॲड.दीपाली बोरुडे यांनी महिलांसाठी अनेक कायदे सरकारने केले तसेच आरक्षण देखील दिले यातून महिलांनी आपल्या क्षेत्रात काम करताना कायद्यांचा वापर करावा तरच महिला सर्व क्षेत्रात यशस्वी ठरतील.
माजी नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे यांनी महिलांसाठी विविध उपक्रम वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था राबवते विविध परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या मुलींपासून ते कर्ज वाटप आणि सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला यातून विठ्ठलराव वाडगे आणि त्यांच्या स्नुषा सौ. सायली वाडगे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी महिलाना कर्ज वाटप सौ.प्रतिभा आक्का पाचपुते यांच्या हस्ते तर सफाई कामगारांचा सन्मान डॉ.भाग्यश्री ताकपेरे, ॲड.दीपाली बोरुडे आणि सौ.सायली वाडगे यांच्या हस्ते साडी देऊन करण्यात आला. प्रास्ताविकात सौ.सायली वाडगे यांनी महिला बचत गटात करण्यात आलेले कर्ज वाटप तसेच आगामी योजनांचा आणि महिला सक्षमीकरण ,महिला प्रश्नांबाबत चर्चा केली. सूत्र संचालन सौ.प्रमिला पिसे यांनी केले तर आभार प्रदीप आठरे यांनी मानले.