श्रीगोंदा, ता.१४ मार्च २०२५ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठान श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मार्च रोजी होणारा शिवजयंती उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोरगरीब जनतेसाठी असलेले कार्य, त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांचे स्मरण ठेवत ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश देशमुख (बाबा) आणि उपाध्यक्ष संभाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडणार असून, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख (अहिल्यानगर, दक्षिण) बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी ११:०० वाजल्यापासून दिवसभर, इतिहास अभ्यासकांचे व्याख्यान व विचारमंथन, शिवचरित्रावर मान्यवरांचे भाषण व शुभेच्छा संदेश, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
यंदा मिरवणुकीवर होणारा अवाढव्य खर्च टाळून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. संध्याकाळी ८:०० वाजता संत शेख महंमद महाराज यांच्या पटांगणात श्रीगोंदा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.
शंभूप्रेमींनी आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणांचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.