टीम लोकक्रांती
रायगड : रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली होती. या दोन संशयास्पद बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. बोटींमध्ये शस्त्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे. एका मच्छिमाराने मुंबई पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आता राज्यसरकारकडे या संशयास्पद बोटी संदर्भातील माहिती आली आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशना दरम्यान दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडी हान असून तीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडर्स गन या महिलेची आहे. तीचे पती जेम्स हार्बर्ट हा या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहून यूरोपला जाणार होती. 26 जूनला या बोटीचे इंजिन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला त्यानंतर एका कोरियन युद्धनौकेने त्यांची सुटका केली, त्यांना ओमानला सुपुर्द केले. मात्र समुद्र खवळलेला असल्याले बोटीचे नेतृत्व करता आले नाही आणि ती भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली आहे. अशी माहिती भारतीय कोसगार्डने दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यात फक्त हत्यार होते. बोट कुठून आली आणि त्यात कोण सामील होऊ शकतो, याबाबतचा तपास एटीएसचे पथक करू शकते. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. तसेच मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले स्फोटक देखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते