श्रीगोंदा, दि. ३१ जुलै २०२५ : ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांच्या पाठीशी प्रोत्साहनाची भक्कम ताकद उभी करत अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यात “विद्यार्थी प्रेरणा उत्सव” आयोजित केला. या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवलेल्या व गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या तब्बल २३५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे (आढळगाव), धाडसी कन्या अनुष्का फराटे (मांडवगण), स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थी – पूजा लगड, संदीप भापकर (कोळगाव), श्रेयस खोमणे (लोणीव्यंकनाथ), भक्ती वाणी (ढोरजे), प्राजक्ता कोंथिबीरे, उमेश औटी यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. तसेच काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरूपात मदत देण्यात आली. चैताली श्रीराम (कोकणगाव) हिला सायकल, राखी कुचेकर (काष्टी) हिला स्पर्धा परीक्षेची पुस्तके, तर अस्मिता लगड (तांदळी) हिला अकरावीचे शालेय साहित्य व गणवेश भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, अनिल शिंदे आणि सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते.
डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, “विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास ते नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवतील. शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गुणवत्तेत मोठी वाढ होईल.”
गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी “अग्नीपंख फौंडेशन ग्रामीण भागात चांगले कार्य करत असून त्यांच्या उपक्रमांमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावतो आहे,” असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक राजकुमार इथापे यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी पाचपुते व सहदेव खामकर यांनी केले. आभार प्रा. संजय लाकूडझोडे यांनी मानले.
या वेळी मोहनराव आढाव, हौसराव भोस, प्रशांत गोरे, अकुंश घाडगे, भाऊसाहेब वाघ, नवनाथ दरेकर, अमोल गव्हाणे, निलेश मुनोत, सूरज तुपे, भावना मोहीते, प्रमिला गावडे, विजया लंके आदी मान्यवर उपस्थित होते.