श्रीगोंदा, दि. १ ऑगस्ट २०२५ :
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गंभीर खून प्रकरणाचा छडा लावून आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
२९ मे २०२४ रोजी लिंपणगाव येथील मुंढेकरवाडीतील एक महिला घरातून बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग रजिस्टर नं. ५१/२०२४ अन्वये श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी राजेंद्र जगन्नाथ देशमुख याच्यावर संशय व्यक्त केला. तपासाची चक्रे फिरवत संशयित व त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, जमीन व्यवहार व प्रेमसंबंधाच्या कारणावरून महिलेचा गळा आवळून खून करून तिचे मृतदेहाचे साताराजवळील कालव्यात विल्हेवाट लावल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली.
या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नं. २४५/२०२४ कलम ३०२, २०१ भादंवि अंतर्गत नोंद झाला असून, आरोपींना पुढील तपासासाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या उत्कृष्ट तपास कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोना ज्ञानदेव भागवत व पोकॉ मनोज साखरे यांना प्रत्येकी ₹२५,०००/- रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र जाहीर केले. यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते दोघांना गौरविण्यात आले.
तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सपोनि प्रभाकर निकम, पो.उपनिरीक्षक सचिन लिमकर, संपत कन्हेरे, संजय वाघमारे, नंदकुमार भैलुमे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
याआधी मंदीर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासातही या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्याबद्दल त्यांचा लिंपणगाव ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला होता.
श्रीगोंदा पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.