श्रीगोंदा, दि. २ ऑगस्ट २०२५ : श्रीगोंदे शहरातील ससाणे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे चौकात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे तसेच नगरसेवक व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
सकाळी ९ वाजता ससाणे नगर व सिद्धार्थ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रेरणादायी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. विशेष आकर्षण ठरली ती लहुजी झांज पथकाची सादरीकरण. सकाळी ११ नंतर भव्य रथातून शाहू, फुले, आंबेडकर यांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यांवर झांज नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी राणी फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, तहसीलदार डोंगरे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
दरम्यान, बहुजन समता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात वसंतराव सकट व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जयंती साजरी केली. यावेळी श्रीगोंदे खादी ग्रामोद्योगचे चेअरमन बापूसाहेब गायकवाड, संतोष इथापे, पत्रकार चंदन घोडके, पत्रकार किशोर मचे, पत्रकार अमर घोडके, पँथरचे संजय रनसिंग, मनोज घाडगे, मीना शेंडगे हे उपस्थित होते.
ससाणे नगर येथे झालेल्या या जयंती उत्सवाचे आयोजन नंदकुमार ससाणे, अनिल भैय्या ससाणे, संदीप उमाप, शिवा घोडके, राजेंद्र ससाणे, लाला ससाणे, नितीन ससाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले.
श्रीगोंद्यात उत्सवाने बहुजन विचारधारेचे आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत अण्णाभाऊ साठेंच्या कार्यास अभिवादन करण्यात आले.