श्रीगोंदा, दि. ७ ऑगस्ट २०२५ :
इन्फिनाईट बीकॉन, सिस्पे, आयबी ग्लोबल, झेस्ट एएमसी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने शेअर बाजारात आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी डिजिटल प्लॅटफॉर्म व स्थानिक एजंट यांच्या मदतीने ग्रामीण भागातील लोकांना आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीस काही परतावा दिला गेला, मात्र काही कालानंतर कंपन्यांचा संपर्क तुटला आणि गुंतवलेले पैसे अडकले.
या प्रकारामुळे श्रीगोंदा, पारनेर, बारामती, पुणे, शिरूर आदी तालुक्यांतील शेकडो कुटुंबांना जबर आर्थिक फटका बसला आहे. अनेकांनी बचत, दागिने गहाण ठेवून किंवा कर्ज काढून गुंतवणूक केली होती. परिणामी संसार ढासळले असून, मानसिक तणावामुळे आत्महत्येचे प्रकारही घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी नवनाथ औताडे यांच्यासह काही प्रतिनिधींवर गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
चौकट :
राजेंद्र नागवडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “ही फसवणूक फक्त आर्थिक नाही, तर जनतेच्या विश्वासावर झालेला मोठा घाव आहे. त्यामुळे स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. सीआयडीमार्फत तातडीने चौकशी सुरू करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा.”