श्रीगोंदा, दि. २९ ऑगस्ट २०२५ :
इनामगाव – वांगदरी – ढोकराई रस्ता हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात विशेष रस्ता दुरुस्ती (SR) योजनेतून मंजूर करून घेतलेला आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप नागवडे यांनी म्हटले आहे.
रस्त्याच्या उद्घाटनाबाबत त्यांनी पुढे आरोप केला की, “स्वतःच्या गावाच्या विकासात एक रुपयाचाही निधी न देऊ शकणारे राजेंद्र नागवडे यांनी अजितदादांना कुठलीही पूर्व कल्पना न देता, कोणताही सरकारी कार्यक्रम किंवा प्रोटोकॉल नसताना, विद्यमान आमदारांना निमंत्रण न देता केवळ स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अपूर्ण रस्त्याचे उद्घाटन करवून घेणे हे हास्यास्पद आहे.”
नागवडे यांनी सांगितले की, अजितदादा हे महायुतीचे घटक असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना न कळवता अपूर्ण कामाचे उद्घाटन करण्यात आले, हा प्रकार संयुक्तिक नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
“हा कार्यक्रम शासकीय पत्रिकेत नव्हता. त्यामुळे अजितदादांना खोटे सांगून उद्घाटन करायला लावले असावे असे वाटते. आणि जर निधी त्यांनीच आणला असेल तर अपूर्ण कामाच्या उद्घाटनाची एवढी घाई का?” असा सवालही संदिप नागवडे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणी विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेद्वारे खुलासा करावा, अशी मागणीही संदिप नागवडे यांनी केली आहे.