श्रीगोंदा, दि. ८ सप्टेंबर :
गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांना ‘व्हाईस ऑफ मीडिया’तर्फे ममतेचा स्पर्श देण्यात आला. पोलिसांना प्रेमाने भरलेली जेवणाची पॅकेट्स देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शनिवारी स्थानिक पोलिस ठाण्यात हा उपक्रम पार पडला. यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे व पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते पोलिसांना जेवणाचे पॅकेट्स वितरित करण्यात आले.
या वेळी लोखंडे म्हणाले, “कर्तव्य बजावताना पोलिसांना वेळेवर जेवण मिळत नाही. पण पत्रकारांनी केलेली ही मदत आमच्यासाठी केवळ जेवण नसून आपुलकी आणि आधाराची खरी भावना आहे.”
व्हाईस ऑफ मीडिया अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी सांगितले की, “गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलिस बांधव तासन्तास सतर्क राहतात. वेळेवर न मिळालेलं जेवण आणि तणाव त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे संस्थापक संदीप काळे, कार्यकारिणी सदस्य गोरक्षनाथ मदने व दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला. पोलिसांना दिलेला छोटासा दिलासा आमच्यासाठीही मोठा आनंद आहे.”
यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार विजय उंडे, सुहास कुलकर्णी, दत्ता जगताप, मुश्ताक पठाण, सर्जेराव साळवे, राजू शेख, गणेश कांबळे उपस्थित होते.