श्रीगोंदा, दि. १६ सप्टेंबर २०२५ :
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीगोंदा ते श्री क्षेत्र मांदळी या मार्गावर नवीन बस सेवा सुरू होत असून उद्या, बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता या बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.
ही बस सेवा श्रीगोंदा – आढळगाव – तांदळी दुमाला – टाकळी – कोसेगव्हाण – भोसे – खांडवी – कोंभळी – श्री क्षेत्र मांदळी असा मार्गक्रमण करणार आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, व्यवसायिक तसेच धार्मिक कारणांसाठी पंचक्रोशीतील नागरिकांना ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या बस सेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच भाविकांकडून केली जात होती. या मागणीसाठी आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी श्रीगोंदा आगार प्रमुख संदीप ढवळे यांच्याकडे अधिकृत निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
आगार प्रमुख ढवळे यांनी तातडीने दखल घेत सदर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या वेळी आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा हिराबाई गोरखे, तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, ह.भ.प. माऊली महाराज, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोरखे तसेच सेनेचे अन्य कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बस मार्ग :
श्रीगोंदा → आढळगाव → तांदळी दुमाला → टाकळी → कोसेगव्हाण → भोसे → खांडवी → कोंभळी → श्री क्षेत्र मांदळी
जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आवाहन केले की, “या बस सेवेचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा आणि ही सेवा निरंतर राहील यासाठी सहकार्य करावे.”