श्रीगोंदा, दि. २० सप्टेंबर २०२५ :
श्रीगोंद्यातील एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.१० वाजता घडलेल्या या प्रकाराने महाविद्यालयीन सुरक्षेवरील प्रश्नचिन्हे अधिक गडद झाली आहेत.
सिद्धेश्वर मंदिराजवळ एका युवकाने चारचाकी गाडी मधून मुलीचा पाठलाग करत “मला तू आवडतेस, मी तुला ओळखतो” अशा संवादाच्या नावाखाली छेड काढण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्यावर त्याने गाडी थेट तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कॉलेजसमोरील सिक्युरिटी कर्मचार्यांनी तत्काळ कारवाई करत मुलीला सुरक्षित केले. मात्र, धाडसी मुलीच्या नजरेत नजर रोखून “तुझ्याकडे पाहून घेईन” अशी धमकी देत आरोपी पसार झाला.
या घटनेची लेखी तक्रार विद्यार्थिनीने प्राचार्यांकडे केली आहे.
चैकट – जबाबदार कोण?
श्रीगोंद्यातील महाविद्यालयीन परिसर ‘सुरक्षेचा बुरुज’ ठरण्याऐवजी मुलींसाठी भीतीचे गड ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षकाने अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार गाजत असतानाच ही घटना घडली.
मुलींच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या जबाबदार यंत्रणांच्या ‘निष्काळजीपणा’ मुळे पालक व विद्यार्थिनींच्या मनात प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थिनी कॉलेजला जाताना सुरक्षित नाही, मग सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?
पालकांचा थेट सवाल – “आमच्या लेकींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरणाऱ्या यंत्रणांवर कडक कारवाई होणार का, की पुन्हा एखादी घटना घडल्यानंतरच जाग येणार?”
सर्वसामान्यांचा एकमुखी सूर – “छेडछाडीच्या प्रत्येक प्रकरणात तात्काळ कठोर शिक्षा होईपर्यंत मुलींची खरी सुरक्षा शक्य नाही.”