श्रीगोंदा, दि. २४ सप्टेंबर २०२५ :
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या डिजिटल माध्यमातील पत्रकारांवर झालेल्या जबरी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, श्रीगोंदा तालुका शाखेतर्फे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर काही समाजकंटकांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही पत्रकार गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवेदनावेळी देण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, हा प्रकार माध्यम स्वातंत्र्यावर थेट घाला असून चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारांचा गळा घोटण्याचा हा प्रकार शासनाने गांभीर्याने घेऊन नराधम हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही निवेदनातून जोरदारपणे करण्यात आली.
निवेदन सादर करताना श्रीगोंदा प्रेस क्लब अध्यक्ष विशाल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, माजी अध्यक्ष अंकुश शिंदे, पत्रकार आप्पासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल झेंडे, मुख्य सचिव मेजर भिमराव उल्हारे, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर मचे, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष नितीन रोही, पत्रकार वैभव हराळ आदी पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने घेतला आहे.