श्रीगोंदा, दि. २४ सप्टेंबर २०२५ :
साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व तांत्रिक प्रगतीसाठी दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन या आघाडीच्या संस्थेतर्फे आयोजित ७० वी वार्षिक परिषद व शुगर एक्स्पो २०२५ मध्ये ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रेपाटील यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या मानाच्या पुरस्काराचा स्वीकार ओमराजे बाबूराव बोत्रेपाटील यांनी केला.
पुरस्कार वितरण सोहळा भव्य दिमाखात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी साखर उद्योगातील नामांकित मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एस. टी. आय. ए. चे अध्यक्ष संजय अवस्थी तसेच एस. आय. एस. एस. टी. ए. चे अध्यक्ष एन. चिन्नप्पन यांचा समावेश होता.
बाबूराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार ग्रुप नेहमीच साखर उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उद्योगाच्या प्रगतीत मोलाची भर घालत आला आहे. शेतकरी हितसंबंध जोपासत उत्पादनवाढ, गुणवत्ता सुधारणा आणि व्यवस्थापनातील आधुनिकता यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत ही गौरवमुद्रा प्रदान करण्यात आली.
साखर उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बोत्रेपाटील यांचे योगदान आदर्शवत असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. पुरस्कार स्विकारताना ओमराजे बाबूराव बोत्रेपाटील यांनी हा सन्मान संपूर्ण ओंकार ग्रुप व शेतकरी बांधवांना अर्पण करत उद्योगाच्या आणखी प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.