टीम लोकक्रांती : श्रीगोंद दि.८ ऑक्टोबर २०२२ : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड च्या सन २०२२-२३ या ४८ व्या गळीत हंगामाचा गव्हाण पूजन समारंभ सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी २-३० वाजता राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील यांचे शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी दिली.
कारखान्याने येत्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण केलेली असून येत्या गळीत हंगामात गतवर्षीपेक्षा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून भोस म्हणाले की महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ ऑक्टोबर पासून गाळपास परवानगी दिलेली आहे. तथापि दिनांक १० ऑक्टोबरच्या शुभ मुहूर्तावर गव्हाण पूजन करून मोळी टाकण्यात येणार असून प्रत्यक्ष गाळप १५ तारखेनंतर सुरू होणार आहे.
या कार्यक्रमास माजी मंत्री व तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल दादा जगताप, साखर संघाचे संचालक घनश्याम अण्णा शेलार, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, श्रीगोंदा यांच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी ताई पोटे तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गव्हाणीची विधीवत पूजा कारखान्याच्या संचालिका सौ. मेघा संदीप औटी व त्यांचे पती संदीप रामभाऊ औटी तसेच संचालिका सौ. मंदाकिनी मारुती पाचपुते व त्यांचे पती मारुती लक्ष्मण पाचपुते या उभयतांचे शुभ हस्ते होणार असून काटा पूजन लिंपणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. शुभांगी ताई उदयसिंह जंगले व त्यांचे पती उदयसिंह शिवाजीराव जंगले यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस संचालक मंडळ व कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले आहे
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)