टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी दि.१६ ऑक्टोबर २०२२ : कोरोना कालावधीनंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याची व वेतन पथकातील नामंजूर बीले तातडीने मंजूर करण्याची मागणी शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आमोद नलगे यांनी केली आहे.
गेली दोन वर्ष कोरोना कालावधीमध्ये सरकारी नोकरदारांना सण उत्सव साजरा करता आले नव्हते. सर्वांनी घरातच राहून कोरोनाचे नियम पाळून आपले कर्तव्य पार पाडले होते. परंतु कोरोनाचा प्रभाव आता सध्या कमी झाल्याने व दिवाळी निमित्ताने बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी खरेदीची ओढ लागली असल्याने व दिवाळी २४ तारखेपासून सुरू होत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यावर जमा करावे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल. कारण दिवाळी या महिनाअखेरीस असल्याने व नियमित वेतन हे एक तारखे नंतर होत असल्याने दिवाळी हंगाम संपून जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी खरेदीचा आनंद घेता येणार नाही ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने वेतन अदा करण्यात यावे .
तसेच अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक विभागात नियमानुसार दिलेली मेडिकल बीले , इतर सर्व प्रकारचे वेतन आयोगाचे हप्ते व इतर बीले पेंडिंग असून ती ताबडतोब मंजूर करून मार्गी लावावीत अशी मागणी ही आमोद नलगे यांनी केली आहे.
स्त्रोत:(माहेशकुमार शिंदे)