टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२१ ऑक्टोबर २०२२ : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडून १५ कोटी ६० लाख रुपयांचे पेमेंट सभासद शेतकरी व कामगारांना अदा करण्यात आले मुळे ऐन दिवाळीच्या वेळी हातात पैसे आल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, शेतकरी व कामगारांची त्याचबरोबर व्यापारी दुकानदारांची दिवाळी गोड होणार असल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सभासद शेतकरी व कामगार वर्गाकडून कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ आर पी यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. परंतु गळीत हंगाम सुरू होताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता २६०१ रुपया प्रमाणे ऊस दर जाहीर केला होता. गळीत हंगाम बंद झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे रुपये २४३४ पैसे ८५ याप्रमाणे एफआरपीची रक्कम कारखान्याने ऊस उत्पादकांना अदा केली होती. परंतु जाहीर केलेल्या २६०१ मधील उर्वरित पेमेंट १६६ रुपये १५ पैसे प्र. मे.टन याप्रमाणे सुमारे १३ कोटी ५० लाख रुपये १७ ऑक्टोबर रोजी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
त्याचप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे कामगारांना दीपावली करिता नऊ टक्के बोनस, मागील सन २०१५ च्या करारामधील फरकाचा पहिला हप्ता व पगार मिळून सुमारे दोन कोटी दहा लाख रुपये कामगारांना अदा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सभासद शेतकरी व कामगार वर्गाच्या मनामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कामगार युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड आनंदराव वायकर यांनी कारखाना व्यवस्थापनाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
कारखाना व्यवस्थापनाने सभासदांना दिवाळी करिता साखर वाटपाचे गटवार व अतिशय सूत्रबद्ध नियोजन केले असल्यामुळे सर्व सभासदांना अतिशय सुलभरीत्या साखर उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे कामगारांनाही सवलतीच्या दरात दिवाळीसाठी साखर विक्री केल्यामुळे सर्वांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळी गोड केल्याबद्दल सभासद शेतकरी व कामगारांकडून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)