टीम लोकक्रांती : आष्टी प्रतिनिधी दि.२३ ऑक्टोबर २०२२ : आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात असलेल्या आष्टी तालुका सहकारी दुध संघाच्या वतीने दुध उत्पादक सहकारी संस्थाना दिवाळीनिमित्त वार्षिक दुधाच्या प्रति दहा पैसे लीटर प्रमाणे १ कोटी रुपयांचा बोनस वाटप करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे व दिनकर दाणी (मामा)यांनी दिली.
आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक दूध संकलन असणाऱ्या आष्टी तालुका सहकारी दूध संघामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दूध उत्पादक सहकारी संस्थांना बोनस वाटण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये वर्षभर संस्था दूध उत्पादक संस्थांचे वीस पैसे प्रतिलिटर कपात होतात त्याला जोडून प्रत्येक दिवाळीला दूध संघातर्फे प्रति लिटर वार्षिक दहा पैसे लिटर म्हणजेच एकूण तीस पैसे लिटर प्रमाणे दूध संघ दिवाळीला १ कोटी रुपये बोनस रूपात संस्थांना दिला आहे.
तसेच दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दिवाळी बोनस वाटप करण्यात आले आहे. सध्या आष्टी तालुक्यामध्ये अतिवृष्टीने कहर केला असून तसेच लंपी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने बोनस देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे दिवाळीची मोठी भेट दिल्याने शेतकरी व दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)