टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२९ ऑक्टोबर २०२२ : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने केलेली साखर निर्यात विक्री ही केंद्र शासनाच्या दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या राजपत्राच्या अधीन राहूनच योग्य दराने केलेली असून कमी भावाने साखर विक्री केली नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी केला आहे.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याने केंद्र सरकारच्या आदेशा पेक्षा कमी भावाने साखर विक्री केली असून त्यामुळे कारखान्याचा तोटा झाला असल्याची तक्रार कारखान्याच्या काही सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांचेकडे केली असून त्या संदर्भात दैनिक वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी खुलासा केला आहे की, साखर विक्री बाबत केंद्र सरकारचे डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत साखर विक्री करताना एम एस पी पेक्षा कमी दराने विक्री करू नये असे आदेश आहेत. त्याप्रमाणे नागवडे कारखान्याने अद्याप देशांतर्गत साखर विक्री करताना एम एस पी पेक्षा कधीही कमी दराने साखर विक्री केलेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ओ.जी. एल. नुसार साखर विक्री करताना त्यावर केंद्र शासनाचे एम एस पी चे निर्बंध नाहीत. त्यामुळे देशातील व राज्यातील साखर कारखाने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्या त्या वेळच्या इंटरनॅशनल मार्केटमधील दरानुसार साखर विक्री करत असतात. त्याप्रमाणे नागवडे कारखान्याने ओ.जी. एल. नुसार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखर निर्यात केलेली आहे. यामध्ये कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
नागवडे कारखान्याने योग्य वेळी सदरची साखर निर्यात केल्यामुळे सदर साखरेची साठवणूक व विक्री या कालावधीतील कोट्यावधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड वाचलेला आहे ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आलेली नसावी. त्यामुळेच त्याबाबतच्या अज्ञानापोटी त्यांनी प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांचेकडे तक्रार केली असल्याचे मत भोस यांनी व्यक्त करून यासंबंधीचा सविस्तर खुलासा कारखान्याने प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांचेकडे दिलेला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे.
भोस यांनी पुढे म्हटले आहे की नागवडे कारखान्याने ओ.जी.एल. नुसार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखर विक्री केली असून त्यावर डोमेस्टिकचे निर्बंध नाहीत असा स्पष्ट उल्लेख तक्रारदारांनी तक्रारी सोबत जोडलेल्या केंद्र शासनाच्या राजपत्रात केलेला आहे. डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट यामधील फरक नीट समजून घेतला असता तर तक्रारदाराने तक्रार केली नसती.
श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखाना हे तालुक्याचे वैभव असून या कारखान्यामुळेच श्रीगोंदा तालुका आज समृद्धीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज सहकारी साखर कारखानदारी फार मोठ्या संघर्षातून वाटचाल करीत आहे. अशा वेळी सर्वसामान्य सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही कामधेनू सर्वांनी सामंजस्याने व एकोपाने टिकविण्याची व ती पुढे नेण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. केवळ व्यक्तीत्वेषा पोटी किंवा राजकीय आकसाने सभासदांनी कारखान्या विरुद्ध वारंवार शासन दरबारी खोट्या तक्रारी करू नयेत असे आवाहन करून भोस म्हणाले की, कारखान्याच्या कामकाजाबाबत जर कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी अगोदर कारखाना ऑफिसला यावे प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटावे. आम्हाला भेटावे जर त्यांचे निरसन झाले नाही तर पुढे जावे परंतु केवळ आकसाने संस्थेची बदनामी होईल असे कृत्य कोणीही करू नये अशी विनंती भोस यांनी केली आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)