टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३१ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तहसील कार्यालयावर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, अनिल मामा घनवट यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना,पाटपाणी कृती समिती व स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाच्या वतीने शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी.दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी.श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी शेजारील अंबालिका कारखान्याप्रमाणे बाजारभाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी.कारखान्यांनी एफ.आर.पी व काटामारीची चोरी थांबवावी.
तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस संपेपर्यंत कार्यक्षेत्राच्या बाहेरिल ऊस गाळप करू नये.तसेच खासदार व आमदार यांच्या निधीतून कारखान्यांभोवती वजन काटे बसवण्यात यावेत.तसेच शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या मालाला हमीभाव द्यावा.तसेच श्रीगोंदा तालुक्यातील अनेक वर्षांपासून एकाच कार्यालयात एकाच पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्या.या विविध मागण्यांसाठी श्रीगोंदा बस स्थानक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कारखानदार हे एफ.आर.पी चोरी व काटा मारून शेतकऱ्यांचे रक्त शोषणाचे काम करत आहे.त्यांना धडा शिकवून सर्व सामान्यांच्या पोरांना सत्तेत बसवा. स्वतंत्र भारत पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी घनवट म्हणाले कि, तालुक्यातील चारही साखर कारखानदार हे लोकांची लूट करत आहे.शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना सरकारला व तालुक्यातील कारखानदारांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, अॅड. अजित काळे, विक्रम शेळके अॅड बाळासो पवार, भाऊसाहेब मांडे यांच्यासह आदींची भाषणे झाली. या मोर्चात अनिल भुजबळ महादेव म्हस्के, लालासाहेब सुद्रिक, रमेश गिरमे, कांतीलाल कोकाटे, राजेंद्र भोस, झुंबर खुरांगे,भाऊसाहेब पवार, संतोष जठार यांच्यासह शेतकरी बांधव व सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटपाणी कृती समितीचे सचिव माऊली मोटे यांनी प्रास्ताविक केले व भूषण बडवे यांनी सूत्रसंचालन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा : (आप्पा चव्हाण)