टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.७ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्याला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.अनेक प्रमुख रस्ते मागील काही दिवसांपासून पासून खड्डेमय झालेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे तातडीने सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे पूर्वभागातील शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी केली होती.परंतू निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने राजेंद्र म्हस्के व या भागातील नागरिकांनी श्रीगोंदा-कर्जत या मार्गावरील घोडेगाव याठिकाणी खड्ड्यात बसून आंदोलन केले.
दरम्यान राजेंद्र म्हस्के म्हणाले की,निवेदन देऊन दहा दिवस झाले असून अद्याप खड्डे बुजवण्यास सुरुवात केली नाही.म्हणून आज खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.तालुक्याची “आंधळं दळतंय व कुत्रं पीठ खातयं” अशी अवस्था आहे.सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेत्यांचे लक्ष नाही.नेत्यांच्या गाड्या लक्झरीयस असल्यामुळे बहुतेक त्यांना रस्त्यावरिल खड्डे जाणवत नसतील परंतु सर्वसामान्य दुचाकी वर चालणाऱ्या लोकांना भयंकर त्रास होत आहे. आता कारखाना सुरू झाल्यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी निदान खड्डे बुजविण्याचे गरजेचे आहे.आठ दिवसांत खड्डे बुजवून झाले नाहीत तर रास्तारोको करून तीव्र आंदोलन करणार असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बावस्कर साहेब यांनी आंदोलन स्थळी जाऊन लेखी आश्वासन दिले.शाखा अभियंता म्हणाले कि, तालुक्यातील सर्वच रस्ते आम्ही बुजविणार आहोत.काही ठिकाणी आम्ही खड्डे बुजवण्यास सुरुवात देखील केली आहे.श्रीगोंदा-घोडेगाव-हिरडगाव या रस्त्याचे टेंडर झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.परंतू आत्ताची रस्त्याची दुरावस्था पाहता आम्ही दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणार आहोत. लेखी आश्वासन दिल्यानंतर राजेंद्र म्हस्के व या भागातील नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलना दरम्यान या भागातील लोकांनी होणारा त्रास सांगत हळहळ व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.यावेळी घोडेगावचे माजी सरपंच लक्ष्मण मचे, उपसरपंच दादा दरेकर, हिरडगावचे माजी सरपंच दत्तात्रय भुजबळ,उपसरपंच राजेंद्र दरेकर,चांडगावचे माजी सरपंच महादेव म्हस्के,संदिप वाघमारे, बाळासाहेब भुरे, रमेश दरेकर यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा : (आप्पा चव्हाण)