टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२७ नोव्हेंबर २०२२ : भारतीय संविधानाचा सर्व नागरिकांना परिचय व्हावा त्याचबरोबर संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे. कायद्याचे राज्य, समाजहित, नियम, अधिकार, उद्दिष्टे व मूल्य यांचा प्रचार प्रसार व्हावा.या उद्देशाने संविधान दिन सर्वत्र साजरा करणे गरजेचे आहे. कारण समता हाच संविधानाचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. राम ढगे यांनी केले.
७३ व्या भारतीय संविधानानिमित्त संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी भारतीय राज्यघटना व सद्यस्थिती या विषयावरती बोलत होते. अध्यक्षस्थानी कला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश साळवे हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, प्रा. अनंत सोनवणे, डॉ. राजाराम कानडे हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. राहुल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचा व संविधानकर्त्यांचा परिचय देऊन संविधानाला धर्मग्रंथ मानावा, कारण कोणत्याही धर्मापेक्षा संविधानाने प्रत्येक नागरिकांस समान हक्क व अधिकार दिलेले आहेत. माणूस हाच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन करून प्रा.डॉ.प्रकाश साळवे यांनी उद्देशिकेचे वाचन केले व ले.कर्नल रत्नाकर झिटे यांनी मूलभूत कर्तव्याचे वाचन केले.
यावेळी दिग्विजय भवाळ या विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त केले. प्रा. देवेंद्र बहिरम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले व कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील अध्यापक, कार्यालयीन सेवक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा