टीम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | नंदकुमार कुरूमकर
दि.१९ जानेवारी २०२३ : गुरुवार दि.१९ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा व लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (बापू) प्रतिष्ठान श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम महाविद्यालयात घेतले जातात. दि.१९ रोजी लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापू) यांची ८९ वी जयंती साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त श्रीगोंदा शहरातून बापूंच्या प्रतिमेच्या रथाचे दर्शन देण्यात आले. सोबत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी घेण्यात आली. तसेच भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. भव्य रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत ६२ बॅग रक्त संकलित झाले.तसेच व्याख्यानमाला आयोजित करत तृतीय पुष्प गुंफण्यात आले.या व्याख्यानमालेचे हे १५ वे वर्ष आहे.
सालाबादप्रमाणे व्याख्यानमालेत अनेक व्याख्याते बौद्धिक ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात.संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्रदादा नागवडे यांचे मार्गदर्शनपर प्रेरणेतून या व्याख्यानमाला होत आहेत. व्याख्यानमालेसाठी संस्था अध्यक्ष,विश्वस्त यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते.
व्याख्यानमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकपर उद्भोधनात सदर व्याख्यानमालेचे उद्देश सांगताना बापूंच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच आपल्या महापुरुषांचे विचार किती महत्वाचे आहेत याची जाणिव उपस्थित विद्यार्थ्याना करुन दिली.
या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफण्यासाठी व्याख्याते चंद्रकांत महाराज वांजळे उपस्थित होते.त्यांनी मार्गदर्शनपर उद्भोधनात ” संस्काराची विद्यापीठे हरवलेत कुठे ? ” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे उर्फ बापूंच्या कार्याचा आढावा घेतला.त्यांनी ” शिवाजी बापू चालते बोलते संस्काराचे विद्यापीठ आहे” असे प्रतिपादन केले.कुटुंब हे संस्काराचे पहिले विद्यापीठ आहे.आई, वडील व शिक्षक यांच्याप्रती आदर,निष्ठा व श्रद्धा ही संस्काराची प्रथम विद्यापीठे आहेत.त्यांच्या कष्टाची जाणीव उज्वल भविष्यासाठी लाख मोलाचे आहे.हे संस्कार एकनिष्ठपणा निर्माण करत असतात.
व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भूषविले होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात महर्षी शिवाजीराव नागवडे उर्फ बापूंच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. बापूंच्या आचारांचा,विचारांचा व संघर्षाचा वारसा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय बापूंच्या प्रेरणेने नेहमीच सामाजिक जाणिव असणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देत असते असे प्रतिपादन केले.
- बापूंच्या आचारांचा,विचारांचा व संघर्षाचा वारसा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे – मा.राजेंद्रदादा नागवडे
या व्याख्यानासाठी सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) कारखाना उपाध्यक्ष बाबासाहेब भोस व सर्व संचालक विश्वस्त उपस्थित होते.तसेच श्रीगोंद्यातील सुज्ञ नागरिक,प्राध्यापक वृंद व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.शंकर गवते यांनी व केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुरेश रसाळ यांनी केले.
लोकक्रांती वृत्तांकन