टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२० जानेवारी २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी श्रीगोंदा शहरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकनेते राजेंद्र म्हस्के व पै.आप्पासाहेब सोनवणे मित्र मंडळाने भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजन केले असून २६ जानेवारी रोजी श्रीगोंदा बाजारतळ येथे हे कुस्ती मैदान होणार आहे.अशी माहिती राजेंद्र म्हस्के व आप्पासाहेब सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा पैलवानांचा तालुका आहे. अलीकडे कुस्त्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. परंतु तालुक्यातील तरुणांना व पैलवानांना प्रेरणा मिळावी व कुस्ती या कलेला वाव मिळावा म्हणून आपण या स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. आप्पासाहेब सोनवणे म्हणाले की,मला कुस्तीची आवड आहे खूप दिवसांपासून मैदान घेण्याची इच्छा होती.राजेंद्र म्हस्के यांच्यासारखा सहकारी मिळाल्याने माझी इच्छा पूर्ण झाली.श्रीगोंदा शहरात प्रथमच भूतो ना भविष्य असे मैदान होणार आहे.
हे कुस्त्यांचे मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील अनेक पैलवान धावपळ करत आहेत.या भव्य आखाड्यात तालुक्यातील मुलींच्या देखील कुस्त्या ठेवण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणारा सिकंदर शेख याची एक नंबरची कुस्ती होणार आहे.त्यामुळे सिकंदर शेखची कुस्ती पाहण्याची उत्सुकता कुस्ती प्रेमींना लागली आहे.
या भव्य निकाली कुस्ती मैदानात जवळपास ७० कुस्त्या होणार आहेत.त्यामध्ये पै.सिकंदर शेख विरूद्ध पै.कमलजित सिंग यांच्यामध्ये एक नबंरची कुस्ती पाच लाख रूपयांची होणार आहे.या कुस्तीचे सौजन्य बापू माने व आप्पासाहेब सोनवणे यांनी केले आहे. दोन नंबरची तीन लाख रूपयांची कुस्ती पै.माऊली जमदाडे विरूद्ध पै.रविराज यांच्यामध्ये होणार आहे. या कुस्तीचे सौजन्य नगरसेवक मनोहर पोटे यांनी केले. तीन नंबरची दीड लाख रुपयांची कुस्ती पै सुरेश पालवे विरुद्ध शकील शेख यांच्यामध्ये होणार आहे. या कुस्तीचे सौजन्य बापूसाहेब गोरे व नानासाहेब कोथिंबिरी यांनी केले.
महिला विभागामध्ये एक नबंरची कुस्ती पंचावन्न हजार रुपयांची होणार असून सौजन्य जवक साहेब यांनी केले आहे.दोन नंबरची कुस्ती एक्कावंन हजार रुपयांची होणार आहे.या कुस्तीचे सौजन्य संतोष म्हस्के यांनी केले आहे.
या कुस्ती मैदानाची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.त्यामुळे कुस्त्या पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होणार आहे.तालुक्यातील कुस्ती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
लोकक्रांती वृत्तांकन