टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.१७ मार्च २०२३ :
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील छत्तीस गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वाड्या वस्त्यावर, शेतात राहणारे प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची बेलवंडी पोलीस स्टेशनच्या आवारात आज बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गुन्हे प्रतिबंधासाठी उपायोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व छत्तीस गावातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये गावातील मुख्य ठिकाणांच्या चौकात चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामनिधीतील तरतुदीनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्यांचे मॉनिटरिंग करणे, प्रत्येक गावातील दहा पोलीस मित्रांची पोलिसांसोबत रात्रगस्त करणे, वाड्यावस्त्यावर तेथील तरुणांचा सहभाग घेऊन रात्रगस्त वाढवणे, गावामध्ये तसेच वाड्यांवस्त्यावर सेफ्टी डोअर बसवण्याबाबत जनजागृती करणे, ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावामध्ये गस्त घालणे, ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी व रात्रीच्या वेळी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ढवळगाव चौक, गव्हाणवाडी, चिंभळा चौक व कोळगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुन्हे प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे , प्रत्येक गावातील दहा पोलीस मित्रांची नावे देणे, याविषयी पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांनी मार्गदर्शन केले .याप्रसंगी बेलवंडी गावातील ट्रेकर्स पोलीस ग्रुपच्या तरुणांना पोलीस मित्र या संघटनेचे टी-शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ढेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस कॉन्स्टेबल हसन शेख, बेलवंडीचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार, हंगेवाडीचे तुळशीराम रायकर, तसेच इतर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल हसन शेख यांनी दिली.
लोकक्रांती वृत्तांकन