टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.१९ मार्च २०२३ :
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळगाव व परिसरात शेतकऱ्यांचा चोरीला जाणारा माल विकत घेणारे व चोरून विकणारे यांच्यावर नजर ठेवून कायदेशीर कारवाई करणार असल्याची ग्वाही तसेच कोळगाव मध्ये प्रमुख चौकांमध्ये, वाड्यां वस्त्यांवर व घरांच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्यामुळे आरोपी पकडण्यास मदत होईल असे आवाहन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कोळगाव ग्रामस्थांना दिली. यावेळी गावाच्या सुरक्षेसाठी पोलीस मित्र संघटना उभारण्याचे सुतोवाच त्यांनी केले.
कोळगाव फाटा येथे सायंकाळी झालेल्या कोळगाव ग्रामस्थांच्या समवेत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे, पोलीस मित्रांबरोबर रात्रीची गस्त वाढवणे, कोळगाव फाटा येथे नाकेबंदी करणे, गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना करणे अशा विविध मुद्द्यांवर ग्रामस्थांशी चर्चा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत उपसरपंच अमित लगड यांनी केले. श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे यांनी कोळगाव परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली. त्यासाठी गावची दोन एकर जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले. परिसरात काही विशिष्ट लोक शेतकऱ्यांचा माल चोरून येतात व विविध प्रकरणात शेतकऱ्यांवरच उलट कारवाईची धमकी देतात त्याला आळा घालण्याची मागणी हेमंत नलगे यांनी केली.
यावेळी माजी उपसरपंच नितीन नलगे, शरद लगड, कुकडी कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन विश्वास थोरात, गुंजाळ महाराज, गोरख घोंडगे, चिमणराव बाराहाते, भास्कर लगड, आबासाहेब लगड, संकेत नलगे, सुयश जाधव, विशाल लगड, हिरामण पवार ,प्रतीक लगड, जालिंदर साबळे, ओंकार नलगे, बाळासाहेब लगड, बबन लगड, ज्ञानेश्वर साठे, संकेत लगड, पिंटू कर्पे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन शेख व खेडकर तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन