जगताप, शेलारांनी पोरकटपणा सोडावा! आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवू नये- जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस

ज्यांना नागवडे कुटुंबाने आमदार केले, त्यांनी आता गलिच्छ राजकारण सुरू केले- राजेंद्र नागवडे

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.४ एप्रिल २०२३:
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार यांनी पोरकटपणा सोडावा त्यांनी आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवू नये, असा इशारा नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार्श्वभूमीवर शेलार, जगताप व शिर्के यांनी पत्रकार परिषदेत बाबासाहेब भोस नेमके कोणत्या पक्षात आहेत? ते कधीच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. असा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेऊन त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला

बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, मी यापूर्वीच जाहीर केले की मी पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता असून राष्ट्रवादी पक्षातच आहे. श्रीगोंदा तालुक्यात विविध स्थानिक संस्थांमध्ये पक्ष विरहित राजकारण न करता सहमतीच्या राजकारणातून पदाधिकारी निवडावेत काही संस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला कारभार पाहतात. यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. परंतु खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने सहमती दर्शवली होती. परंतु या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल असताना नागवडे व पाचपुते यांचे उमेदवार कसे पडतील असा निर्णय काही चांडाळ चौकडींनी राबवला. आणि गलिच्छ राजकारण सुरू केले.

असे सांगून भोस पुढे म्हणाले की, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा चेअरमन आणि काँग्रेसचा व्हाईस चेअरमन असा देखील फॉर्मुला ठरला होता. परंतु तो देखील या निवडणुकीत पाळला नाही. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाळावा हे देखील राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी ठणकावून सांगितले होते. परंतु त्यांचा अंतिम निर्णय देखील या जगताप, शेलार, नहाटा यांनी पाळला नाही. आणि आम्हाला मात्र नेमके तुम्ही कोणत्या पक्षात आहेत? असा सवाल केला जात आहे. एखाद्या नेत्याला जर कोणी मानत असेल तर व्यासपीठावर येऊन प्रवेश करायचा असे काही नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे चारित्र्य एकदा तपासून पहावे.

असे सांगून बाबासाहेब भोस आणखी पुढे म्हणाले की, तालुक्यात काही संस्थांचे दर्जेदार काम आहे. त्या संस्थेमध्ये राजकारण न करता सहमतीने पदाधिकारी निवडावेत. ही आमची भावना होती. परंतु ते देखील त्यांना मान्य नाही. कुकडीच्या उष्ट्या पंतरवाळी चाटणाऱ्यांनी मला हे सांगावं. असा टोला हरिदास शिर्के व अण्णासाहेब शेलार यांना भोस यांनी लगावला.
याबरोबरच जगताप शेलार यांना नागवडे कुटुंबांनी आणि मी स्वतः राजकारणात मदत केली ती आमची मोठी चूक झाली. मात्र जनता त्यांना आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये जागा निश्चित दाखवेल. असा ठाम विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की, जिल्हा बँकेत देखील गद्दारी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठेच्या गप्पा सांगू नये असा इशारा देखील बाबासाहेब भोस यांनी यावेळी दिला.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की, पाठीमागे वळून पाहिल्यानंतर राहुल जगताप यांना सहकार महर्षी बापूंनी मोठी मदत करत आमदार केले. अण्णासाहेब शेलार यांना देखील साखर कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती मदत केली. बाळासाहेब नहाटा यांनाही भानगाव पंचायत समितीतून नागवडे कुटुंबाने खंबीर साथ देत मदत केली. तालुक्यातील सर्वच नेत्यांना नागवडे कुटुंबांनी सहकार्य करून मदत केली. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थां व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळता महाविकास आघाडी मध्ये फूट पाडून पाडापाडीचे राजकारण केले. तालुक्यात काही मंडळी गलिच्छ राजकारण करण्यामध्ये पटाईत आहेत. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मातृ संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव देत असतानाच न्याय कसा मिळेल हा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. या निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी उद्या आम्ही निर्णय जाहीर करणार असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रास्ताविकात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी यावेळी श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थिती आढावा घेत मागील खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा देखील मागोवा घेतला.

या पत्रकार परिषदेस तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, प्रशांत दरेकर, राकेश पाचपुते ,भाऊसाहेब नेटके, प्रा सुरेश रसाळ, डी आर आबा काकडे, प्रशांत शितलकर, भीमराव लबडे भाऊसाहेब बरकडे, मारुती पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, लक्ष्मण रायकर आदी यावेळी उपस्थित होते. आभार नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!