टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२ जून २०२३ :
आषाढी एकादशी निमित्त संत श्री शेख महंमद महाराज यांचा पालखी सोहळा नव्याने सुरू करण्याचा श्रीगोंदेकरांनी निर्णय घेतला आहे. याबाबद देहू वरून तुकाराम महाराजांचे वंशज हभप माणिक मोरे महाराज यांना भेटून मोलाचे मार्गदर्शन घेतले आहे. १९ जून रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र श्रीगोंदा वरून श्रीक्षेत्र पंढरपूर कडे पालखीचे प्रस्थान होणार आहे अशी माहिती आज दि. २ जून रोजी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेत संयोजकांकडून देण्यात आली.
नगर प्रदक्षिणा घालून पालखीचे पुढे प्रस्थान होणार आहे. श्रीगोंदा ही संतांची भूमी असून या ठिकाणी अनेक संतांचे वास्तव्य राहिलेले आहे श्रीगोंदा हे शहर दक्षिण काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक देव देवतांचे पुरातन मंदिरे आहेत. श्री संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते १९ जून रोजी पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर २७ जून रोजी पिराची कुरुळी येथे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांची भेट होणार आहे ही एक खूप मोठी भक्तांसाठी ऐतिहासिक पर्वणी असणार आहे.
या पालखी सोहळ्यासाठी सर्वच स्तरातून सक्रिय सहभाग लाभत आहे १३ तारखेला हभप माणिक मोरे महाराज श्रीगोंदयात येणार आहेत ते पालखी सोहळ्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. सोहळ्याला अनेक अन्नदात्यांनी अन्नछत्र दिले आहे. तर अनेक डॉक्टर व मेडीकल व्यावसायिकांनी या पालखी सोहळ्यासाठी मोफत औषधे व आरोग्य व्यवस्था करणार आहेत. संत शेख महंमद महारांची पालखी मार्ग व मुक्काम – श्रीगोंदा – शेडगाव – खेड – भिगवण – पळसदेव – इंदापूर – बावडा – अकलूज – दसूर – (पिराची कुरुळी येथे संत तुकाराम महाराज व माऊलींच्या पालखीची भेट) – पंढरपूर आशा प्रकारे या मार्गाने पालखी सोहळा पंढरपूर मध्ये श्री पांडुरंगाच्या भेटीस जाणार आहे.
या पालखी सोहळ्यात जाणाऱ्या भाविकांना कसलीही भिशी भरावी लागणार नाही आता पर्यंत एक हजारच्या जवळपास लोकांची नोंदणी झाली आहे ही संख्या वाढत आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या पालखी सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, हभप भूषण महाराज महापुरुष, संत श्री शेख महंमद महाराज यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळराव मोटे, नगरसेवक सतीश मखरे, माजी नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे,आघाव भाऊसाहेब, संदीप दहातोंडे, भाऊसाहेब खेतमाळीस, झुंजरुक तात्या व वारकरी संप्रदायातील संयोजक उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन