गायरान जमिन मुद्द्यावरून कोळगाव ग्रामसभेत खडाजंगी..!

आजी-माजी सरपंचामध्ये जुंपली..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांना कोळगाव येथील पाच एकर गायरान जमीन देण्याच्या मुद्द्यावरून कोळगाव येथील ग्रामसभेत माजी सरपंच व उपसभापती बाळासाहेब नलगे तसेच लोकनियुक्त सरपंच व माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोळगाव चे प्रथम लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड हे होते.

विशेष ग्रामसभेत माजी सरपंच बाळासाहेब नलगे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीस पाच वर्षांपूर्वी दोन एकर जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही कोळगाव ग्रामपंचायतिच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर जागेचा प्रस्ताव नाकारून मागील मीटिंगमध्ये गायरान जमिनीचा नवीन पाच एकर जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवला असल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. तसेच सदर गायरान जमीन शासनाला व्यापारी कामासाठी देता येत नसल्याबद्दल चे आक्षेप घेतले.
त्यास लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सदर प्रस्ताव पाठवण्यात आला असून जर प्रस्ताव नामंजूर झाला तर मान्य करू असे उत्तर दिले. तसेच यापूर्वी बाळासाहेब नलगे यांनी वर्ग २ जमिनीवर गरीब लोकांची घरकुले स्वतःच्या जागेत जागा खरेदी देऊन कशी बसवली असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली अखेर ग्रामसेवक कवडे यांनी पूर्णपणे माहिती घेऊनच प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली.

आज झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अंगणवाडी सेविकांनी माहिती दिली. शेतकऱ्यांनी शेतामध्ये बांबू लागवड करावी, कृषी योजनेच्या फळ व पिकांचा विमा १५ जुलै च्या आत काढावा, फळबाग लागवडीच्या योजना मध्ये सहभागी व्हावे, शालेय विद्यार्थिनींसाठी सायकलिंग चे नवीन प्रस्ताव सादर करावेत, सेंट्रल बँकेमार्फत गोल्ड लोन च्या योजनेचा फायदा घ्यावा, तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, नागरिकांनी नियमितपणे घरपट्टी व पाणीपट्टी भरावी असे आवाहन यावेळी ग्रामपंचायत तसेच विविध विभागांमार्फत करण्यात आले. या ग्रामसभेमध्ये रेशन दुकानदार व सेतू चालकांनी विविध दाखल्यांसाठी कुठल्याही प्रकारची शुल्क घेऊ नये, घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. अंगणवाडी सेविका व अशा सेविकांनी लाडकी बहीण योजना फॉर्म जास्तीत जास्त भरावेत अशी सूचना करण्यात आली. विविध प्राथमिक शाळांमध्ये कंपाउंड, किचन शेड, शौचालय व स्वच्छतागृह, नवीन अंगणवाडी व वर्ग खोल्या उपलब्ध नसल्याबद्दल संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी यावेळी तक्रारी केल्या. कोळाईदेवी विद्यालयामध्ये मुलींसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे विद्यालयाच्या वतीने मागणी केली. एचडीएफसी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी च्या विविध योजना यावेळी मांडण्यात आल्या.
या ग्रामसभेस उपसरपंच माया मेहेत्रे ,सदस्य विश्वास थोरात,जयराज लगड, महेंद्र रणसिंग, विलास शितोळे, निखिल लगड, नंदकुमार लगड, कमल आढाव, संजय जगताप, निलेश काळे, चिमणराव बाराहाते, धोंडीबा लगड, माजी उपसरपंच नितीन नलगे, संतोष मेहत्रे, मिठू शिरसाठ, लक्ष्मण गायकवाड, संग्राम लगड व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट
या ग्रामसभेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य मिठू मेजर यांनी मोहरवाडी तलावातील अतिक्रमण काढणे, ग्रामीण रुग्णालयाबद्दलची सद्यस्थिती लोकांना अवगत करणे, पेयजल योजनेबद्दल माहिती देणे, बन्सी मोहारे यांनी कोळगाव स्टॅन्ड वरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला. माजी उपसरपंच नितीन नलगे यांनी कन्हेरमळा येथील रोहित्राचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. लक्ष्मण गायकवाड यांनी तोंडेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व तेथील पूलांशेजारील झाडेझुडपे काढण्याचे मुद्दे उपस्थित केले. नागरिकांनी यावेळी पावसामुळे ठिकठिकाणी झालेले खड्डे मुरमांनी भरून काढावेत व रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे झुडपे काढावीत अशी मागणी केली.

चौकट
या विशेष ग्रामसभेमध्ये, ज्या आई-वडिलांना मुले सांभाळत नाहीत त्या वृद्ध व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने भोजन व पोशाख देण्यात येईल व जी मुले आई वडिलांना सांभाळत नाही त्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येईल असा ठराव यावेळी ग्रामसभेच्या वतीने करण्यात आला.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
81 %
8.3kmh
72 %
Sun
24 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
28 °
error: Content is protected !!