लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२४ :
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यानंतर १९६२ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक झाली तेंव्हा श्रीगोंदा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होता. त्यावेळेस शेवगावचे बाबुराव महादेव भारस्कर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. १९६७ मध्ये पुन्हा बाबुराव भारस्कर यांना काँग्रस पक्षाने उमेदवारी दिली व ते निवडून आले.१९७२ मध्ये कोंग्रस पक्षाने कोळगाव येथील रहिवाशी प्रभाकर भाऊराव शिंदे यांना उमेदवारी दिली व बाबुराव भारस्कर अपक्ष उभे राहिले व त्यांनी काँग्रसचे उमेदवार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला परंतु निकाल वेगळाच लागला असे म्हणायला हरकत नाही यात बाबुराव भारस्कर तिसऱ्यांदा निवडून आले.१९७७ या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस हा मतदारसंघ खुला झाला व त्यावेळेस काँग्रेस पक्षाने शिवाजीराव नारायणराव नागवडे यांना तिकीट दिले. त्यांना तोडीस तोड असा श्रीगोंदा तालुक्यात उमेदवार नसल्याने जनता पक्षाने कोपरगावचे मोहनराव आबाजी गाडे यांना तिकीट दिले त्या निवडणुकीत नागवडे विजयी झाले. १९८० साली देशातील अनेक राज्यातील सरकारे केंद्राने बरखास्त केले त्यात महाराष्ट्राचे सरकार बरखास्त झाले. १९८० ला पुन्हा निवडणूक झाली त्यात काँगेसने शिवाजीराव नागवडे यांना उमेदवारी दिली तर त्यांचे विरोधात तत्कालीन पंचायत समिती सदस्य बबनराव पाचपुते यांनी उमेदवारी केली व त्यावेळेस बबनराव पाचपुते विजयी झाले. १९८५ ला नागवडे व पाचपुते यांची लढत झाली पुन्हा एकदा पाचपुते विजयी झाले.१९९० व १९९५ या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत पाचपुते विजयी झाले.१९९९ ला बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत काँग्रेसचे शिवाजीराव नागवडे यांच्या विरोधात निवडणूक लढली यावेळेस शिवाजीराव नागवडे विजयी झाले. २००४ व २००९ या दोन्ही वेळेस पुन्हा बबनराव पाचपुते विजयी झाले. २०१४ साली प्रथमच नागवडे कुटुंबातील कोणीही उमेदवार नव्हते तर त्यांची जागा पिंपळगाव पिसा येथील रहिवाशी व जिल्हा परिषद सदस्य राहुल जगताप यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली या निवडणुकीत राहुल जगताप निवडून आले. २०१९ ला राष्ट्रवादीने घन:शाम शेलार यांना उमेदवारी दिली व भाजपने बबनराव पाचपुते यांना उमेदवारी दिली त्यात पाचपुते विजयी झाले. थोडक्यात काय तर पहिल्या तीन-चार पंचवार्षिक वगळता श्रीगोंदा मतदार संघातील विधानसभेची उमेदवारी व पाचपुते हे गणित आज पर्यंत तालुक्याने पहिले.
राज्यात थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्या दृष्टीने विचार केल्यास अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात आघाडीवर नाव येते ते म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे. जर विद्यमान अमदरास तिकीट देण्याचे धोरण अवलंबले तर बबनराव पाचपुते यांना भाजप पक्षा कडून तिकीट मिळू शकते. परंतु मध्यंतरीच्या काळात राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आपली दावेदारी जवळपास निश्चित केली आहे. अजित पवार गट व भाजप यांची युती असल्यामुळे जर भाजपला जागा दिली तर अजित पवार गटाकडून उमेदवारीस इच्छुक असलेल्या अनुराधा राजेंद्र नागवडे ह्या काय निर्णय घेतात यावर बरेच गणित अवलंबून आहे. शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची तालुक्यातून जोरदार चर्चा आहे. काँग्रेस कडून घन:शाम शेलार दावा सांगू शकतात तशी त्यांची मोर्चे बांधणी चालू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी शक्तीप्रदर्शन करत आपणही उमेदवारी करण्यास इच्छुक आहोत असे दर्शविले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणही वेळोवेळी सर्व नेत्यांना मदत केली आहे त्यामुळे या वेळी मलाच उमेदवारी साठी सर्व नेत्यांनी मदत करावी व सावड फेडावी असे सांगताना माझी ही शेवटची निवडणूक आहे असे सांगून उमेदवारी साठी दावेदारी प्रबळ केली आहे.
महाराष्ट्रातील महत्वाच्या पक्षांचा विचार केला तर शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस यांची आघाडी तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांची युती या सर्व पक्षांचे श्रीगोंदा मतदार संघातील जागेचे तिकिट कोणाच्या वाट्याला जाते यावर बरेच अवलंबून आहे. श्रीगोंदा मतदार संघाचा विचार केला तर अनेक नेते उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये शिवाजी कर्डीले, बाबासाहेब भोस, राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, टिळक भोस, दत्ता पानसरे, स्मितल वाबळे यांच्या नावांची चर्चा होताना दिसत आहे. प्रमुख पक्षांची जर आघाडी झाली नाही तसेच युतीही झाली नाही तर प्रत्येक पक्ष आपला उमेदवार देईल आणि तालुक्यातील प्रमुख इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल जर तर च्या या खेळामध्ये यावेळी आमदारकीची माळ कोणाच्या गळयात पडणार कोण ठरणार बाजीगर हे काही दिवसात पहायला मिळेल.