पुढील दोन महिन्यात रयतच्या सर्व शाखा इंट्रॅक्टिव्ह बोर्ड ने आधुनिक होणार – चंद्रकांत दळवी
श्रीगोंदा, ता. २८ : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांच्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ऑनलाइन पद्धतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले महात्मा फुले यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज कडे आरोपींना शिक्षा धरण खोदण्याची असली पाहिजे, तसेच नवीन संकरित वाण निर्माण केले पाहिजेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई निर्माण केल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पाण्यासाठी ‘राधानगरी’ हे धरण तर ‘उद्योगनगरी’ उद्योगांसाठी उभा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना जलसंपदा, रोजगार आणि वीजमंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवले, त्यातील भाक्रानांगल धरण, बारमाही पाणी सुविधा आणि वीज निर्मिती व वितरण पॉवरग्रेड निर्माण केले. कर्मवीर भाऊराव पाटील या तीनही महापुरुषांचे वारसदार म्हणून होते. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आधुनिकता होती आज रयत शिक्षण संस्थेने कात टाकली आहे. भविष्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे. समाजालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्था आधुनिकतेचा स्वीकार करत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये प्रत्येक शाखा इंट्रॅक्टिव पॅनेल बोर्डने सुसज्ज होईल. खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षण देण्याचे कार्य रयतच्या माध्यमातून चालू आहे. येणाऱ्या काळात जेईई, नीट यासारख्या परीक्षांसाठी आदर्श मार्गदर्शन केले जाणार आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांच्या प्रगतीचा आढावा जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी घेतला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांच्या स्थापने संदर्भातला व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास व प्रगतीतील वेगवेगळ्या शहरातील लोकांची योगदान स्पष्ट केले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही पक्ष भेद विसरून रयतच्या मंचावर एक मुखाने काम करत आहोत आणि करत राहू असा शब्दही दिला.
याप्रसंगी मंचावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील रयत शिक्षण संस्थेचे सचिव सेवानिवृत्त अधिकारी विकास देशमुख, आमदार बबनराव पाचपुते, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार , आण्णासाहेब शेलार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,, मनोहर पोटे, टिळक भोस तसेच श्रीगोंदा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री धीवर, प्रा. शरद साळवे व प्रा. शहाजी मखरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महादजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप भुजबळ, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी यांनी परिश्रम घेतले. तिन्ही रयत संकुलातील सर्व सेवक, प्राध्यापकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.