बच्चुभाऊ कडूंशी चर्चा करून त्यांना माझी अडचण सांगून विनंतीपूर्वक अर्ज मागे घेतला – घनशाम शेलार
श्रीगोंदा, ता. ८ : श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवारीअर्ज मागे घेतल्यानंतर घनशाम शेलार यांनी भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले दि. ४ रोजी काँग्रेस पक्षाचे सक्षम नेतृत्व असलेले बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, रमेश चैनीथला यांचा निरोप आला आपण काँग्रेस पक्षाबरोबर थांबावं चांगल्या प्रकारची संधी दिली जाईल असा शब्द दिल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली.
२०१९ च्या विधानसभेच्या पराभवानंतर लगेच मतदार संघामध्ये सक्रिय झालो मागील पाच वर्षांमध्ये सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे उमेदवारी अर्ज अपक्ष भरला परंतु कुठल्यातरी पक्षाचा आधार असावा, म्हणून बच्चुभाऊ कडू यांच्याशी बोलून प्रहार कडून अर्ज भरला परंतु या निर्णयामुळे काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली.
दरम्यान राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते यांचा मेळ घालून यांच्याजवळ एकत्र येण्याची भूमिका मांडली त्यांना यापुढे अनेक ठिकाणी संधी आहेत माझी ही शेवटची संधी होती परंतु या सर्व गोष्टींना यश आले नाही. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निरोप आल्याने काँग्रेस सोबत थांबून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असे घनशाम शेलार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शेलार म्हणाले राजकीय आयुष्यात कुठेही तडजोड केली नाही कोणालाही मी मिंधा न राहता निर्णय घेतला आहे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तेवढी उंची नाही. तडजोड केली असे म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. कार्यकर्त्यांशी बोलून महाविकास आघाडी साठी सोमवार पर्यंत भूमिका स्पष्ट करणार विधानसभेच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी मी भूमिका मांडल्यानंतर बोलू नये असही शेलार म्हणाले.