टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ सप्टेंबर २०२२ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसने श्रीगोंद्यात शनी मंदिराबाहेर नारळ, तेल, फुल व अगरबत्ती विकून राष्ट्रीय बेरोजगार दीन म्हणून साजरा केला.
यावेळी बोलताना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशाचा जीडीपी दर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत खाली आला. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना थेट आर्थिक पॅकेजची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी, लघु व मध्यम उद्योग यापैकी कोणत्याही घटकाला मदत मिळाली नाही. केंद्र सरकार राज्यांची आर्थिक कोंडी करण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत बिगर भाजपशासित राज्यांचा कारभार चालवणे मुश्कील झाले आहे. सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा अजेंडा नरेंद्र मोदी राबवत आहेत. रोजगार नसल्याने तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नाही.केंद्र सरकारच्या निषेधार्थ श्रीगोंदा शनि चौक येथे शनिमंदिर समोर नारळ विकून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला.
आंदोलनात अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष धर्मनाथ काकडे,श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक सतिष सर मखरे, उपाध्यक्ष संतोष काळाने, जिल्हा युवकचे सरचिटणीस राहुल साळवे, विध्यार्थी काँग्रेस चे शहर अध्यक्ष धीरज खेतमाळीस, उपाध्यक्ष सागर बेलेकर, सोशल मीडिया समन्वयक भूषण शेळके, शिवाजी घोडके आदी कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)