शिक्षण, उपक्रमशीलता आणि सामाजिक बांधिलकीची दखल
श्रीगोंदा, दि. १२ जुलै २०२५ : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘बी द चेंज’ फाउंडेशन या सामाजिक संस्थेने श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सुपुत्र गणेश रोहिदास राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले आहे. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवंडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे कार्यरत आहेत.
हा सन्मान सोहळा रविवारी (दि. २९ जून) शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. पोपटराव पवार होते. त्यांच्या हस्ते राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३६ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गणेश राऊत यांनी ग्रामीण भागात कार्यरत राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास, विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि सामाजिक जाणीवेच्या कार्यातून एक आदर्श शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन सांगली जिल्ह्यातील जि.प.प्राथमिक केंद्र शाळा नागवाडी (नागनाथनगर) ता. खानापूर येथे शिक्षक म्हणून नोकरीस लागले. या ठिकाणी बारा वर्षे नोकरी करत असताना अनेक गुणवंत आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला त्याचेच फळ म्हणून त्यांना “बी द चेंज” सामाजिक संस्थेच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांची निवड केली. याशिवाय संस्थेने राज्यातील आणखी २० शिक्षकांना निवडून सन्मानपत्र देऊन गौरविले.
या पुरस्कारामुळे राऊत सरांवर सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून शिक्षक, पालक, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सन्मान, उत्साह आणि गौरवाच्या वातावरणात पार पडला.