“इव्हेंट लाइटिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव – ओंकार एंटरप्राईजेसचे सोमनाथ धेंडे राज्यस्तरीय ‘संघर्षरत्न समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित”
श्रीगोंदा, दि. १७ ऑगस्ट २०२५ :
शेडगावचे युवा उद्योजक सोमनाथ धेंडे यांचा राज्यस्तरीय “संघर्षरत्न समाजभूषण पुरस्काराने” सन्मान करण्यात आला आहे. संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित संघर्षरत्न – समाजभूषण सोहळा २०२५ अंतर्गत १५ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा येथील तुळशीदास मंगल कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात परमपूज्य सुदाम महाराज गोरख गुरुजी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, दादासाहेब कळमकर, माजी म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
ओंकार एंटरप्राईजेस या इव्हेंट लाइटिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे संस्थापक सोमनाथ धेंडे यांनी शून्यातून उभारलेल्या या व्यवसायाला आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. फिल्मफेअर अवॉर्ड, विविध महोत्सव, मंदिरांतील कार्यक्रम तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभा–समारंभामध्ये ओंकार एंटरप्राईजेसची लाइटिंग झळकताना दिसते. सोनू निगम, श्रेया घोषाल, मिका सिंग, बादशाह अशा अनेक नामांकित कलाकारांच्या कार्यक्रमांमध्येही त्यांनी व्यावसायिक लाइटिंग यशस्वीरित्या केली आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत शेडगाव व परिसरातील शाळांना संगणक संच, वॉटर फिल्टर, एलईडी टीव्ही, साहित्य वाटप, तलाठी कार्यालयासाठी इन्वर्टर, तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना धेंडे यांनी मदत केली आहे. त्यांच्या जनाई प्रतिष्ठान या संस्थेमार्फत वयोवृद्धांसाठी पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूरसह विविध तीर्थक्षेत्रांना मोफत यात्रांचे आयोजन केले जाते.
अत्यंत साध्या परिस्थितीतून प्रवास सुरू केलेले सोमनाथ धेंडे आज पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटीत वास्तव्यास असून त्यांनी स्वतःचा “Khus World O Light” हा लाइटिंग ब्रँड देखील चायना मध्ये विकसित केला आहे. मागील २५ वर्षांपासून व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देत धेंडे यांनी संघर्षातून यशाचा आदर्श घालून दिला आहे.
- संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार हा त्यांच्या अथक परिश्रमांच्या संघर्षातून यशस्वी झाल्याचा व सामाजिक कार्याचा सन्मान ठरला आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.